पुणे : प्रचलित वेळापत्रकानुसार १० जून रोजी मोसमी वारे मुंबईसह राज्य व्यापतात. मात्र, यंदा एल निनोचे सावट असताना मोसमी वाऱ्यांनी हे प्रचलित वेळापत्रक चुकवले आहे. आवश्यक शक्ती आणि बाष्पाचा अभाव असल्याने मोसमी वाऱ्यांची पुढील आगेकूच थांबल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले असून, पुढील तीन ते चार दिवसांत मोसमी वाऱ्यांची प्रगती होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
प्रचलित वेळापत्रकानुसार मोसमी वारे तळकोकणात ७ जून रोजी दाखल होतात. मात्र, यंदा एक दिवस आधीच, ६ जून रोजी मोसमी वाऱ्यांचे तळकोकणात आगमन झाले. त्यामुळे मध्य महाराष्ट्रातही मोसमी वारे वेळापत्रकानुसार दाखल होऊन पाऊस पडण्याची अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र, हे वेळापत्रक चुकल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मोसमी वाऱ्यांच्या पुढील प्रगतीला अडथळा ठरणारे घटक सक्रिय आहेत का, मोसमी वाऱ्यांची प्रगती तळकोकणाच्या पुढे का होत नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या पुणे वेधशाळेचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप म्हणाले, ‘तांत्रिकदृष्ट्या १० जून ही मोसमी वाऱ्यांनी मुंबईसह राज्य व्यापण्याची तारीख आहे. मात्र, यंदा तसे झालेले नाही. मोसमी वारे आणखी एक-दोन दिवसांत दाखल न झाल्यास विलंब झाला असे म्हणता येईल. पाऊस सर्वदूर पडतो तेव्हा त्याला मोसमी पाऊस असे म्हटले जाते. सध्या राज्यभरात ठिकठिकाणी पाऊस पडत असला, तरी तो पूर्वमोसमी स्वरूपाचा आहे. पुढील तीन ते चार दिवसांत मोसमी वाऱ्यांची प्रगती होण्याची शक्यता आहे. मात्र, सद्य:स्थितीचे निरीक्षण करण्यात येत आहे.’
मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीला अडथळा ठरणारी प्रणाली किंवा घटक सक्रिय झालेले नाहीत. तर, मोसमी वारे उत्तरेकडे सरकण्यासाठी त्यांच्या आवश्यक शक्तीच निर्माण झालेली नाही. मोसमी वाऱ्यांमध्ये पुरेसे बाष्पही नसल्याने पावसाची तीव्रता तुलनेने कमी आहे, असेही सानप यांनी नमूद केले.
दर वर्षीचा ‘मान्सून’ वेगळा
गेल्या वर्षी मोसमी वारे पुणे-मुंबईत वेळापत्रकाच्या खूपच लवकर, म्हणजे २४ जून रोजीच दाखल झाले होते. मात्र, मोसमी वाऱ्यांनी पुढील प्रगती करून राज्य व्यापण्यासाठी सुमारे १५ दिवस लागले होते. त्यामुळे पाऊस पुढे-मागे होणे ही सर्वसामान्यच स्थिती आहे. प्रत्येक वेळचा ‘मान्सून’ वेगळा असतो, असेही सानप यांनी नमूद केले.
पुणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा ७१ टक्के कमी पाऊस
हवामान विभागाच्या संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये अद्याप पावसाची नोंद झालेली नाही. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये १०० टक्के तूट आहे. १ ते १० जून या कालावधीत पुणे जिल्ह्यात सरासरी ४७.८ मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र, आतापर्यंत केवळ १३.९ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा ७१ टक्के कमी पाऊस झाला आहे. तर राज्यात १ ते १० जून या कालावधीत सरासरी ४०.३ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा केवळ १७.६ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला असून, सरासरीपेक्षा ५६ टक्के कमी पाऊस नोंदवला गेला आहे.
