पुणे : रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशातील ४८ प्रमुख रेल्वे स्थानकांच्या विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील सहा फलाटांचा समावेश असून या स्थानकांवरील धावणाऱ्या गाड्यांची संख्याही दुपटीने वाढविण्यात येणार आहे. यामध्ये बीड, लातूर, सोलापूर, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर मार्गांबरोबरच दक्षिण आणि उत्तर भारतात रेल्वेचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारणार असल्याने राज्यांतर्गत प्रवासात सुलभता आणि गती प्राप्त होणार आहे.
सध्या पुणे स्थानकावरून ६० रेल्वे गाड्या धावत असून दक्षिण, उत्तर भारताकडील लांब पल्ल्याच्या प्रवास होत आहे. मात्र, प्रवाशांची वाढती संख्या, वाढती गर्दी यामुळे मुलभूत आणि पायाभूत सुविधांवर ताण पडत आहे. अपुऱ्या सुविधांमुळे प्रवासामध्ये व्यत्यय येत असल्याने अनेकदा गैरप्रकार घडत आहेत.
त्या पार्श्वभूमीवर आश्विनी वैष्णव यांनी पुढील पाच वर्षात रेल्वे गाड्यांची संख्या दुपटीने वाढवून सहा फलाटांच्या विस्तारीकररणाचा निर्णय घेतला आहे. यामध्ये पुणे स्थानक, हडपसर, खडकी, आळंदी, उरुळीकांचन, फुरसुंगी या सहा स्थानकांच्या विस्तारीकरणाचे काम सुरु आहे. यातील हडपसर आणि खडकी स्थानकाच्या विस्तारीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून हडपसर स्थानकावरून दक्षिणेकडे जाणाऱ्या गाड्या येत्या महिन्यापासून स्थलांतरीत करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
त्याचबरोबर पुणे स्थानकाचा विकास करताना पायाभूत सुविधांवर मोठ्य प्रमाणात कमा केले जाणार आहे. जागेच्या मर्यादेमुळे पुणे स्थानकाच्या विस्ताकीरकरणात अडथळे येत असून प्रशासनाने या ठिकाणी दोन सॅटेलाईट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. खडकी स्थानकावरून उत्तरेकडे जाणाऱ्या गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. जेणेकरून पुणे स्थानकावरील येणाऱ्या गाड्या आणि होणारी गर्दी कमी होईल. प्रवाशा्ंना सुलभ सेवा आणि प्रवास करता येईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
असा विस्तार आणि दिलासा
त्यामुळे पुण्यातील सहा स्थानकांच्या विस्तारीकरणाबरोबर १२ फलाटांचा समावेश आहे त्यामुळे पहिल्या ६० आणि नव्याने वाढविण्यात येणाऱ्या ६० अशा एकूण ११० गाड्या पुण्यातून धावणार असून पुढील पाच वर्षात विस्तारीकरणाचे उद्दीष्ट पूर्ण करण्याचा मानस असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. पुणे-सातारा लोहमार्गावरील उरुळी आणि फुरसुंगी येथील मेगा कोचिंग टर्मिनल उभारण्यात येणार आहे. त्यामुळे दौंड, कुर्डूवाडी, साेलापूर तसेच दक्षिणेकडे जाणाऱ्या गाड्यांना सुलभता प्राप्त होणार आहे. विशेषतः या टर्मिनलमुळे शैक्षणिक, व्यापार, व्यावसायिक, कृषी आणि इतर कामासाठी दैनंदीन डेमुने (लोकल) प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
रेल्वे बोर्डाने घेतलेल्या निर्णयानुसार पुण्यातील वाढती प्रवासी संख्या पाहता पायाभूत सुविधांच्या पार्श्वभूमीवर स्थानकांचे विस्तारीकरण आणि गाड्यांचे स्थलांतर करण्याचे नियोजन सुरू आहे. नवीन वर्षापासून गाड्यांचे स्थलांतर करण्यास सुरुवात झाली असून हडपसर येथून दक्षिणेकडे प्रमुख आणि लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्यात येणार आहे. – हेमंतकुमार बेहरा, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे पुणे.
