पुणे : यंदाच्या मोसमी पावसाच्या हंगामात जूनचा महिनाभर पावसाची प्रतीक्षा करावी लागली. मात्र, जुलैची सुरुवात पावसाने झाली आहे. अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरातील प्रणालीमुळे मोसमी वारे बळकट होऊन पावसासाठी पूरक स्थिती निर्माण झाली असून, पुण्यासह राज्यात जोरदार पावसाची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तवली आहे.
मोसमी वारे दाखल झाल्यानंतर जिल्ह्यातील काही ठिकाणे, घाट परिसरात पाऊस सक्रिय झाला आहे. ताम्हिणी, लोणावळा अशा ठिकाणी एका दिवसात १०० मिलिमीटरपेक्षा पाऊस नोंदवला गेला आहे. काही मात्र, शहरात काही हलक्या सरी वगळता जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे जूनमध्ये शिवाजीनगर येथे केवळ ६४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार गेल्या दशकभरात तीन वेळा जूनमध्ये शिवाजीनगर येथे १०० मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस नोंदवला गेला आहे. त्यात यंदाचा पाऊस हा तिसऱ्या क्रमांकाचा कमी पाऊस ठरला आहे. या पार्श्वभूमीवर जुलैची सुरुवात पावसाने झाली. बुधवारी दुपारनंतर शहर आणि परिसरात पावसाच्या सरी कोसळल्या. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार बुधवारी शिवाजीनगर येथे ११, लोहगाव येथे १३, चिंचवड येथे १२.५ एनडीए येथे ७ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला. जुलैच्या पहिल्या आठवड्यात शहर आणि परिसरात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या हंगामात राज्यात प्रथमच मोसमी पाऊस सक्रिय ते जोरदार स्थितीमध्ये आहे. कोकण किनारपट्टी लगत असलेली कमी दाबाची रेषा, तसेच उत्तर बंगालच्या उपसागरापासून ईशान्य अरबी समुद्रापर्यंत पसरलेली कमी दाबाची रेषा यामुळे मोसमी वारे अधिक बळकट झाले आहेत. ३ जुलैच्या सुमारास बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून, राज्यात अनेक ठिकाणी पाऊस मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, हवामान विभागाच्या जुलैसाठीच्या अंदाजानुसार देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडू शकतो. १९७१ ते २०२० या कालावधीतील पावसाच्या आकडेवारीच्या सरासरीनुसार भारतात जुलैमध्ये सरासरी २८०.४ मिलीमीटर पाऊस पडतो. मात्र, यंदा सरासरीच्या ९४ टक्क्यांपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. लडाख आणि सिक्कीम वगळता देशभरात जवळपास सर्वच राज्यांत सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. विदर्भाच्या पूर्व भागात सरासरीएवढा किंवा सरासरीपेक्षा जास्त, कोकण आणि मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
