पुणे : गेल्या दोन-तीन दिवसांपासून शहरात पावसाच्या हलक्या सरी पडत असताना आता पावसाचा जोर वाढला आहे. मंगळवारी शहरात दिवसभरात २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. बुधवारी (२२ जुलै) घाट परिसराला रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता आहे.

बंगालचा उपसागर, अरबी समुद्रातील हवामान प्रणालींमुळे १ ते ८ जुलै या कालावधीत घाट परिसरासह शहरातही मुसळधार पाऊस पडला. त्यानंतर पावसाने मोठी विश्रांती घेतली. आता पुन्हा विविध हवामान प्रणाली सक्रीय झाल्या आहेत. त्यात पश्चिम-मध्य बंगालचा उपसागरात आणि लगतच्या उत्तर किनारी आंध्र प्रदेशावर चक्रीय स्थिती निर्माण झाली असून, ईशान्य अरबी समुद्रापर्यंत द्रोणीय रेषेची स्थिती आहे. त्यामुळे पावसासाठी अनुकुल स्थिती निर्माण झाली आहे. गेले दोन दिवस शहर आणि परिसरात पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत.

घाट परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. मात्र, मंगळवारी सकाळपासूनच पावसाचा जोर वाढला. भारतीय हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी साडेआठपर्यंत घाट परिसरातील ताम्हिणी येथे १२०, लोणावळा येथे ११५, शिरगाव येथे १२०, आंबोणे येथे ११६, डुंगरेवाडी येथे १००, भिरा येथे १४८ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला. तसेच दिवसभरात शहरातील शिवाजीनगर येथे २०.१, लोहगाव येथे २१.६, चिंचवड येथे १६, कोरेगाव पार्क येथे १४, एनडीए येथे २१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

पुणे जिल्ह्याच्या घाट परिसरासाठी बुधवारी (२२ जुलै) रेड अलर्ट, तर जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. घाट परिसरातील काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार, तर तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच मुंबई, रायगड, पालघर, रत्नागिरी अशा जिल्ह्यांला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच गुरुवारी पुणे, सातारा घाट परिसराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे, अशी माहिती पुणे वेधशाळेने दिली.

विविध हवामान प्रणाली सक्रिय झाल्यामुळे राज्यातील पाऊस सक्रीय ते जोरदार अवस्थेत राहण्याची शक्यता आहे. पुढील ४८ तासांत पुण्याच्या घाट परिसरात अतिमुसळधार, शहरात काही ठिकाणी मुसळधार, मुंबईसह कोकण, नाशिक, सातारा, कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ अनुुपम कश्यपी यांनी दिली.