पुणे : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने घाट परिसरात धुमाकूळ घातला आहे. विशेषतः ताम्हिणी येथे अतिमुसळधार सुरू असून, गेल्या २४ तासांत ताम्हिणी येथे २०० मिलिमीटर पाऊस नोंदवला गेल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली.
मोसमी वारे पुणे आणि परिसरात दाखल झाल्यानंतर पावसाने अल्पावधीतच जोर पकडला आहे. गेल्या तीन दिवसांपासून शहर परिसरात दिवसर पावसाची रिपरिप सुरू आहे. पावसाला जोर नसला, तरी दिवसभर सरींनी पाऊस पडतो आहे. तर घाट परिसरात पावसाची तीव्रता जास्त आहे. लोणावळा, ताम्हिणीसह भोर, निमगिरी अशा ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. हवामान विभागाच्या शनिवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत ताम्हिणी येथे २००, लोणावळा येथे १३६, भोर येथे ८५, निमगिरी येथे ५६,.५, माळीण येथे ३६ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला. तर शहर आणि परिसरातील एनडीए येथे ३३, पाषाण येथे ३१.४, शिवाजीनगर येथे ३०.५, दापोडी येथे २३.५, चिंचवड येथे १९.५, लवळे येथे १०.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई, पालघर, ठाणे, रायगड तसेच नाशिक, पुणे आणि सातारा घाट भागांमध्ये पुढील ४८ तास अतिमुसळधार ते काही ठिकाणी अत्यंत अतिमुसळधार पावसामुळे रेड अलर्ट कायम राहण्याची शक्यता आहे. पुणे शहरातील पावसाचा जोर ५ जुलैच्या दुपारनंतर हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे.
उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरात, तसेच लगतच्या ओडिशा-पश्चिम बंगाल किनारपट्टीवर निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र (पुढील ४८ तासांत अधिक तीव्र होण्याची शक्यता), महाराष्ट्र ते कर्नाटक किनारपट्टीदरम्यानचा ऑफ-शोअर ट्रफ, तसेच २१ अंश उत्तर अक्षांशावरील शिअर झोन (कमी दाबाची रेषा) यांमुळे पश्चिम, मध्य आणि पूर्व भारतातील काही भागांमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस जोरदार ते अतिजोरदार सक्रिय राहिला आहे, असेही अनुपम कश्यपी यांनी नमूद केले.
पुण्यानजीक भिरा येथे पावसाची तीव्रता जास्त
गेल्या काही वर्षांतील कल पाहिल्यास घाट परिसरातील ताम्हिणी येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. मात्र, पुण्यानजीक यंदा रायगड जिल्ह्यातील भिरा येथे तीव्र पाऊस नोंदवला जात आहे. गेल्या २४ तासांत भिरा येथे २४३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. काही दिवसांपूर्वीच भिरा येथे एका दिवसात ४०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस नोंदवला गेला होता.
