पुणे : घाट परिसरात पावसाने हाहा‌ःकार केला आहे. ताम्हिणी, लोणावळा, भिरासह अनेक ठिकाणी अविवृष्टी झाली असून, गेल्या २४ तासांत तब्बल ४०० ते ५०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. तसेच पुणे शहर आणि परिसरातही १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस नोंदवला गेला आहे.

गेल्या काही दिवसांपासून घाट परिसरात तुफान पाऊस पडत आहे. सातत्याने १०० मिलिमीटर, २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस नोंदवला गेला आहे. मात्र, रविवारपासून आज (सोमवार) सकाळपर्यंत झालेल्या पावसाने हाहाःकार उडवला आहे. हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेने आज सकाळी ८.३०पर्यंत झालेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार, लोणावळा येथे ६७०, भिरा येथे ६०९, मुळशी येथे २३०, ताम्हिणी येथे ५८०, शिरवाटा येथे २१९, वाळवण येथे ४४२, आंबोणा येथे ५३७ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला आहे.

घाट परिसरात पावसाचा जोर असताना पुणे शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तुलनेने कमी पाऊस होता. मात्र, रविवारी सायंकाळपासून शहर आणि जिल्ह्यातही भागातही पावसाचे प्रमाण प्रचंड वाढले. आज सकाळपर्यंतच्या आकडेवारीनुसार चिंचवड येथे २०६, भोर येथे १७२, पाषाण येथे ११३, डुडुळगाव येथे ११०, शिवाजीनगर येथे १०९, एनडीए येथे ९८.५, राजगुरूनगर येथे ९५, दापोडी येथे ९३, माळीण येथे ८३, शिरूर येथे ७४.५, हवेली येथे ५४, दौंड येथे ४५, बारामती येथे १५.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.