पुणे : गेल्या काही दिवसांत पावसाने घेतलेल्या विश्रांतीनंतर आता पावसाचे पुनरागमन होण्याची चिन्हे आहेत. पुढील चार दिवसांत पुण्यासह मध्य महाराष्ट्र, कोकण, गोवा, मराठवाडा, विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या पुणे वेधशाळेने वर्तवली असून, गुरुवारी (१६ जुलै) पुणे जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
जुलैच्या सुरुवातीलाच पुण्यासह घाट परिसरात जोरदार पावसाने शहर आणि घाट परिसराला झोडपले होते. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र, अरबी समुद्रातील द्रोणीय रेषा अशा हवामान प्रणालींमुळे मोसमी वाऱ्यांना बळ मिळाले. परिणामी, मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. काही ठिकाणी पूरपरिस्थितीही निर्माण झाली. मात्र, त्यानंतर पावसासाठी अनुकुल स्थिती नसल्याने गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. पुणे शहर, परिसरासह घाट परिसरातही पाऊस पडलेला नाही. मात्र, आता पुन्हा चार दिवसांत पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीननुसार, गुरुवारी (१६ जुलै) पुणे, सातारा येथील घाट परिसर, सांगली, सोलापूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच १८ आणि १९ जुलै रोजी विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे परिसरात आकाश ढगाळ राहण्याचीा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, कोकण, पुणे, नाशिक आणि सातारा घाट परिसरात १७ जुलैपासून पावसात वाढ होऊ शकते. हवामान प्रारुपांनुसार १७ जुलैपासून काही दिवस अरबी समुद्रावरील पश्चिमेकडील वारे अधिक बळकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण आणि लगतच्या घाट भागात पावसाची तीव्रता हळूहळू वाढू शकते. २० जुलैच्या सुमारासबंगालच्या उपसागरात हवामान प्रणाली निर्माण होण्याची शक्यता आहे. ही प्रणाली पश्चिमेकडे सरकल्यास उत्तर-मध्य महाराष्ट्र, छत्तीसगड, दक्षिण मध्य प्रदेश, तसेच पूर्व भारतातील काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. पुणे , मुंबईतही १७ जुलैपासून पावसाची शक्यता असून, २० जुलैनंतर त्यात वाढ अपेक्षित आहे, असे ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ अनुपम कश्यपी यांनी सांगितले.
शहर, परिसरात हलक्या सरी
पुणे शहर आणि परिसरात बुधवारी सकाळपासूनच आकाश ढगाळ होते. त्यानंतर ऊन आणि मळभ असे वातावरण होते. दिवसभरात काही ठिकाणी दोन ते तीन वेळा पावसाच्या हलक्या सरी पडल्या.
