पुणे : गेल्या दोन दिवसांत घाट परिसरातील ताम्हिणी, लोणावळा, भिरा, महाबळेश्वर अशा काही ठिकाणी २४ तासांत ५०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस नोंदवला गेला असून, ही घटना दुर्मीळ असल्याचे निरीक्षण हवामानतज्ज्ञांनी नोंदवले.
सर्वसाधारणपणे घाट परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. कोकण, ताम्हिणी, लोणावळा, माथेरान अशा ठिकाणी एका दिवसात १०० मिलिमीटर, २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडण्याच्या घटना या पूर्वीही घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच भिरा येथे ४०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस नोंदवला गेला होता. त्यानंतर रविवारी केवळ २४ तासांतच ५०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस काही ठिकाणी नोंदवला गेला. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, रविवार सकाळी साडेआठ ते सोमवारी सकाळी साडेआठपर्यंत लोणावळा येथे ६७०, शिरगाव येथे ५४०, आंबोणे येथे ५३७, खोपोली येथे ५१६, ताम्हिणी येथे ५८०, तर भिरा येथे ६०९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
‘बंगालच्या उपसागरात तयार झालेले दाब क्षेत्र पश्चिमेकडे सरकत आहे. मजबूत झालेले वारे घाट परिसरात अडवले जाऊन त्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो. या कारणामुळे एका दिवसात ५०० मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाच्या घटना घाट परिसरातच झाल्याचे दिसून येते. सर्वसाधारणपणे घाट परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असला, तरी इतका जास्त पाऊस पडणे हे नक्कीच दुर्मीळ आहे,’ असे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या पुणे वेधशाळेचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी सांगितले.
ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ अनुपम कश्यपी म्हणाले, ‘ईशान्य भारतातील चेरापुंजी, मौसीनराम येथे एका दिवसात ५०० मिलिमीटर पाऊस पडणे ही सामान्य बाब आहे. मात्र, महाराष्ट्रातील लोणावळा, ताम्हिणी अशा घाट परिसरात एका दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडणे ही नक्कीच दुर्मीळ घटना आहे.’
महाबळेश्वरमध्ये विक्रमी पाऊस
‘महाबळेश्वर येथे २४ तासांत ५१३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. महाबळेश्वर येथे एका दिवसातील पावसाचे आजवरचे सर्व विक्रम मोडीत निघाले आहेत,’ असे एस. डी. सानप यांनी सांगितले.
मुंबईतील महापुराची आठवण
घाट परिसरात २४ तासांत ५०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडल्याने २१ वर्षांपूर्वीच्या अनेकांना मुंबईच्या महापुराची आठवण झाली. मुंबईत २६ जुलै २००५ रोजी एका दिवसात तब्बल ९४४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यापैकी ६४४ मिलिमीटर पाऊस तर सकाळी ८ ते रात्री ८ या केवळ १२ तासांतच झाला होता.
