पुणे : गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसाने पुन्हा घाट परिसर आणि शहराला झोडपून काढले. घाट परिसरात काही ठिकाणी सलग दुसऱ्या दिवशी ५०० मिलिमीटरपेक्षा अधिक, तर शहरातही १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.

बंगालच्या उपसागरातूम पश्चिमेकडे सरकलेले कमी दाब क्षेत्रासह तीन हवामान प्रणाली एकाच वेळी सक्रिय आहेत. त्यामुळे मोसमी वारे मजबूत होऊन पावसासाठी अनुकूल स्थिती आहे. त्यामुळे घाट परिसरासह शहरातही जोरदार पाऊस पडत आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या पुणे वेधशाळेच्या आकडेवारीनुसार मंगळवारी सकाळी साडेआठपर्यंत घाट परिसरातील लोणावळा येथे ६२०, शिरगाव येथे ४२०, वणगाव येथे ३९०, दावडी येथे ६८८, ताम्हिणी येथे ५३०, भिरा येथे ५१२, डुंगरवाडी येथे ४२३ मिलिमीटर पाऊस पडला. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी काही ठिकाणी ४०० ते ५०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस नोंदवला गेला आहे. या अतिवृष्टीमुळे घाट परिसरातील गावांतील जनजीवन विस्कळित झाले आहे.

घाट परिसरात तुफान पाऊस असताना शहरातील पावसाची तीव्रताही कायम आहे. शहर आणि ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी मुसळधार कायम आहे. सकाळी साडेआठपर्यंत नोंदवल्या गेलेल्या आकडेवारीनुसार भोर येथे १३८, निमगिरी येथे १२६, दापोडी येथे १२५.५, डुडुळगाव येथे ११९, पाषाण येथे ११५.६, शिवाजीनगर येथे ९७.५, एनडीए येथे ९५.५ मिलिमीटर पाऊस पडला. तसेच माळीण येथे ८४.५ शिरूर येथे ८१, राजगुरूनगर येथे ७०.५, हवेली येथे ४४, दौंड येथे ३५.५, बारामती येथे २०.४, तर इंदापूर येथे १९.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

हवामान विभागाने आज (मंगळवारी) घाट परिसराला रेड अलर्ट दिला आहे. काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यास आला आहे. तर जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.