Maharashtra Government recruitment: नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागात ९६५ पदे भरण्यास मान्यता देण्यात आल्यानंतर भरती प्रक्रियेसाठी मुद्रांक शुल्क विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. येत्या महिन्याअखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.

सर्वाधिक मोठ्या प्रमाणात महसूल मिळवून देणारा विभाग म्हणून नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग ओळखला जातो. काही दिवसांपूर्वी विभागाची फेररचना करून पदनिर्मिती करण्यात आली होती. त्या संदर्भातील प्रस्तावाला महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंजुरी दिली होती. त्यामुळे राज्याच्या नोंदणी मुद्रांक विभागाला अतिरिक्त ९६५ पदे उपलब्ध होणार आहेत. एकूण पदांची संख्या ही तीन हजार ९५२ एवढी होणार आहे. अतिरिक्त पदांमध्ये अतिरिक्त तीन नोंदणी उपमहानिरीक्षक, दुय्यम निबंधकांची ८० पदे आहेत. तसेच, सहाशेहून अधिक वरिष्ठ, कनिष्ठ लिपिकांची भरती करण्यात येणार आहे.

तीन नोंदणी उपमहानिरीक्षकांच्या पदांमध्ये अंमलबजावणी, धोरण, संशोधन आणि तपासणी यासाठी स्वतंत्र अतिरिक्त पदनिर्मिती करण्यात आली आहेत. त्याशिवाय, मुद्रांक अधीक्षक, सहजिल्हा निबंधक वर्ग दोन, दुय्यम निबंधक वर्ग दोन, उपसंचालक नगररचना, उपअधीक्षक, सहायक नगरचनाकार अशा विविध ४७ प्रकारच्या पदांची भरती होणार आहे. ही भरती प्रक्रिया राबविण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

सेवा ज्येष्ठतेनुसार किती पदे उपलब्ध होत आहेत, किती जणांना पदोन्नती देता येईल तसेच पदोन्नतीनंतर किती पदे उपलब्ध होतील त्यानुसार त्या-त्या पदावर नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

तीन नोंदणी उपमहानिरीक्षक पदावर विभागातील अधिकाऱ्यांना संधी देण्याचा विचार असून, ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात येईल. दुय्यम निबंधक पदासाठी कनिष्ठ, वरिष्ठ लिपिकांमधून पदोन्नती देण्यात येणार आहे. मोठ्या जबाबदारीचे असलेले दुय्यम निबंधक पदासाठी पात्र असणाऱ्यांनाच संधी देण्यात येणार आहे. त्यामध्ये काही पदे ही राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरता येईल का, यादृष्टीने चाचपणी सुरू झाली आहे.