पुणे : धायरी, किरकटवाडी, नांदेड, आंबेगावसह खडकवासला, नऱ्हे आणि नांदोशी या समाविष्ट गावांतील गायरान, तसेच सरकारी जमिनींवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याची कबुली महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
समाविष्ट गावांतील गायरान जमिनींवरील अतिक्रमणासंदर्भात खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना बावनकुळे यांनी ही माहिती दिली. सरकारी आणि गायरान जमिनी बनावट कागदपत्रांच्या आधारे बळकाविल्याची बाब खरी नाही. आंबेगाव, मौजे किरकटवाडी, धायरी येथील काही क्षेत्रांवर अतिक्रमण असल्याचे दिसून येत आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले.
ते म्हणाले, ‘उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अनुषंगाने सरकारी आणि गायरान जमिनीवरील अतिक्रमणे स्थानिक स्वराज्य संस्थेने निष्कासित करण्यासाठी हवेली तालुक्यातील सर्व मंडल अधिकारी, तसेच पुणे महापालिका आयुक्तांना कळविले आहे. ज्या शासकीय जमिनी पुणे महापालिकेकडे देखभालीसाठी हस्तांतरित करण्यात आलेल्या आहेत, त्यांवरील अतिक्रमणांना प्रतिबंध करण्याची जबाबदारी पुणे महापालिकेची आहे.’