पुणे : राज्याच्या परिवहन विभागातील अधिकारी, कर्मचारी १६ जूनपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. पदोन्नती, सेवाप्रवेश नियम आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी २ जून निदर्शने, तर ९ जूनला एकदिवसाचा लाक्षणिक संप आणि १६ जूनपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा विभागातील कर्मचारी संघटनांनी दिला आहे.

परिवहन विभागातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसह उपलेखापाल, लेखापरीक्षक, लिपिक आणि प्रशासकीय पातळीवरील विविध २३ पदांचे पदोन्नती प्रस्ताव मंत्रालय स्तरावर प्रलंबित आहेत. तर, कार्यालय अधीक्षक पदांचे सेवाप्रवेश नियम रखडल्याने हे आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेकडून देण्यात आली.

कार्यालय अधीक्षक पदांचे सेवाप्रवेश नियम तातडीने करावेत, वर्ग तीन संवर्गातील सर्व पदांचे सेवाप्रवेश नियम तयार करावेत, लिपिक टंकलेखक, वरिष्ठ लिपिक यांची पदनामे अनुक्रमे परिवहन सहाय्यक व वरिष्ठ परिवहन सहाय्यक करावीत, प्रतिनियुक्ती रद्द झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरूपी बदल्या संबंधित विभागात कराव्यात, अशा मागण्या संघटनेकडून करण्यात आल्या आहेत.

‘मोटार वाहन विभागाचा आकृतीबंध मंजूर झाल्यानंतर साडेचार वर्षे उलटूनही लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांचे सेवाप्रवेश नियम अनिर्णित आहेत. सेवाप्रवेश नियम नसल्याने पदोन्नती नाकारण्यात येते. वेळोवेळी आंदोलन केल्यानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पदोन्नतीबाबतचे निर्देश दिले. मात्र, प्रशासकीय पातळीवर या आदेशाची अंमलबजावणी करण्यात आली नाही. सहाय्यक मोटार वाहन अभियोक्ता पदांचे सेवानियम नसल्याने विधी पदवीधारक नियुक्तीपासून वंचित आहेत. वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी अशा २३ पदांचे प्रस्ताव मंत्रालय स्तरावर प्रलंबित आहेत,’ अशी माहिती संघटनेचे सरचिटणीस सुरेंद्र सरतापे देण्यात आली.