पुणे : क्यूएस आशिया क्रमवारीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने स्थान उंचावले आहे. विद्यापीठाने गेल्या वर्षीच्या २१०व्या स्थानावरून तुलनेत ३७ स्थाने उंचावत यंदा १७३ वा क्रमांक पटकावला आहे. तसेच क्यूएस रँकिंग ‘एशिया सदर्न’ या गटात २९ वा क्रमांक पटकावला आहे. गेल्या वर्षी या विभागात विद्यापीठ ३७ व्या स्थानी होते. राज्यातील आयआयटी मुंबई, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह एकूण नऊ विद्यापीठांना क्रमवारीत स्थान मिळाले आहे.
क्यूएस आशिया क्रमवारी २०२५ जाहीर करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारी आराखड्यातील (एनआयआरएफ) स्थान यंदा घसरले आहे. मात्र, आता क्यूएस आशिया क्रमवारीत विद्यापीठामे २१० स्थानावरून १७३वे स्थान मिळवत कामगिरीत सुधारणा केली आहे. विद्यापीठाने गेल्या वर्षभरात संशोधन, शैक्षणिक उपक्रम, अभ्यासक्रम, पायाभूत सुविधांमध्ये चांगली सुधारणा करण्यावर भर दिला आहे. मात्र, प्राध्यापकांच्या जागा रिक्त असल्याचा फटका विद्यापीठाला क्रमवारीमध्ये बसत आहे. आता १११ प्राध्यापकांच्या रिक्त जागांची भरती प्रक्रिया पूर्ण होणार असल्याने विद्यार्थी – प्राध्यापक गुणोत्तरात सुधारणा होऊ शकते.
हेही वाचा : ‘महाराष्ट्रवादी घोषणापत्रा’तून बारामतीसाठी आश्वासनांची खैरात
क्रमवारीत आयआयटी मुंबईने ४८वे स्थान पटकावत राज्यातील शिक्षण संस्थांमध्ये आघाडी घेतली आहे. त्या खालोखाल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा क्रमांक लागतो. तर सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ २१६व्या, मुंबई विद्यापीठ २४५ व्या, मुंबईचे इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी ३३६व्या स्थानी आहे. तसेच शिवाजी विद्यापीठ हे ६२१ ते ६४० या गटात, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि एनएमआयएमएस विद्यापीठ ७०१ ते ७५० गटात, अमिटी विद्यापीठ ७५१ ते ८०० या गटात आहे.