दशकभराने महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बदल झाला खरा, पण हाताशी वेळ कमी असल्याने आता नव्या कार्यकारिणीने द्रुतगतीने काम करावे, अशीच साहित्यरसिकांची अपेक्षा आहे. अवघ्या ५० दिवसांवर येऊन ठेपलेला परिषदेचा वर्धापनदिन आणि त्यानंतर लगेचच शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजन, हे प्रामुख्याने दोन महत्त्वाचे टप्पे पार पाडावयाचे असल्याने एकदिलाने पारदर्शक आणि गतिमान कारभाराची अपेक्षापूर्ती करण्याचे शिवधनुष्य पेलावे लागणार आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी संपून निकाल जाहीर झाले, त्याला तीन आठवड्यांचा कालावधी लोटला. परिषदेच्या कार्यकारिणीने निवडणुकीला सामोरे न जाता करोनाची सबब पुढे करून पाच वर्षांची घेतलेली मुदतवाढ संपुष्टात आल्यानंतर दहा वर्षांनी झालेल्या या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. त्याचप्रमाणे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यालय पुण्यात असल्यानेही ही निवडणूक सर्वांसाठीच महत्त्वाची झाली होती. या निवडणुकीत विजयी होणारे अध्यक्ष, प्रमुख कार्यवाह आणि कोषाध्यक्ष हे तीन पदाधिकारी साहित्य महामंडळाचे पदाधिकारी होणार असल्याने आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेली ही निवडणूक चुरशीची झाली.

संघशक्तीच्या सहकार्याने साहित्य संवर्धन आघाडीला यश प्राप्त झाले. स्थानिक कार्यवाहाच्या सातपैकी चार जागांवर या आघाडीचे उमेदवार विजयी झाले. कार्यकारिणीतील अन्य जागांवर परिवर्तन उत्कर्ष आघाडीचे उमेदवार यापूर्वीच ‘बिनविरोध’ निवडून आले होते. निवडणूक संपल्यानंतर आता गतिमान आणि पारदर्शक कारभाराची अपेक्षा नव्या कार्यकारिणीकडून आहे. नव्या कार्यकारिणीची पहिली बैठक १६ एप्रिल रोजी होणार असून, त्यामध्ये दिशा स्पष्ट होणार आहे.

नव्या कार्यकारिणीसमोर पहिले आव्हान असेल, ते महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वर्धापनदिन समारंभाचे. वार्षिक ग्रंथ आणि ग्रंथकार पुरस्कार (ज्यामध्ये विविध वाङ्मय प्रकारामध्ये पन्नासहून अधिक पुरस्कार प्रदान केले जातात) २६ मे रोजी, तर २७ मे रोजी होणाऱ्या वर्धापनदिन कार्यक्रमात ‘मसाप जीवनगौरव’ आणि डाॅ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार प्रदान केले जातात. वार्षिक ग्रंथ पुरस्कारासाठी पुस्तके मागविणे, परीक्षकांची नियुक्ती करून त्यांच्या शिफारशींनुसार पुरस्कारांची निवड करणे, दोन दिवसांच्या कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे ठरविण्याबरोबरच वर्धापनदिन दिमाखात साजरा करणे या साऱ्या नियोजनासाठी जेमतेम ५० दिवस हाताशी आहेत.

परिषदेच्या कामाबरोबरच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कारभाराचे सुकाणूदेखील परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांच्याकडेच आहे. साहित्य महामंडळाची बैठक मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये होणार असून, त्यामध्ये हे पदाधिकारी औपचारिकपणे महामंडळाचे पदाधिकारी म्हणून सूत्रे स्वीकारणार आहेत. मात्र, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा वर्धापनदिन हा पहिला टप्पा पार पडल्यानंतरच साहित्य महामंडळाच्या कामाला आणि पर्यायाने शंभराव्या साहित्य संमेलनाच्या नियोजनाला गती येईल.

अर्थात, यातील एक गोष्ट साहित्य महामंडळाच्या माजी पदाधिकाऱ्यांनी आधीच निश्चित केली आहे. पहिले ग्रंथकार संमेलन भरवून न्या. म. गो. रानडे यांनी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली त्या पुण्यातच आणि ते संमेलन भरविणारी महाराष्ट्र साहित्य परिषद ही आद्य साहित्य संस्थाच शंभराव्या संमेलनाची आयोजक संस्था असेल, याची घोषणा सातारा येथे चार जानेवारी रोजी झालेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सांगता समारंभात झाली होती. त्यामुळे साहित्य संमेलनासाठी निमंत्रणे मागविणे, त्यातून काही ठिकाणांची सूची करून स्थळ निवड समितीची स्थापना करणे, स्थळ निवड समितीचा अहवाल साहित्य महामंडळाच्या बैठकीत संमत करून अंतिम निर्णयाची घोषणा या बाबी आपसूकपणे गळाल्या आहेत.

आता पुण्यात होणाऱ्या शंभराव्या साहित्य संमेलनाच्या सहसंयोजक संस्थेची निवड, अध्यक्षांची, तसेच स्वागताध्यक्षांची निवड, संमेलन स्थळाची निवड, संमेलनाचे उद्घाटक आणि संमेलनात होणाऱ्या वाङ्मयीन चर्चासत्रांतील वक्त्यांची निवड या बाबी पूर्णत्वाला नेण्याची लगबग सुरू होईल. गणेशोत्सव संपल्यानंतर या नियोजनाला गती येईल आणि महाराष्ट्र साहित्य परिषद व साहित्य महामंडळाचे पदाधिकारी हे दुसऱ्या टप्प्यातील आव्हान पार पाडण्यासाठी सज्ज होतील. हे कार्य पार पाडण्यासाठी पदाधिकाऱ्यांना दहा हत्तींचे बळ घेऊन झटावे लागेल, हीच त्यांच्या पदाधिकारी होण्याची फलश्रुती ठरेल.

vidyadhar.kulkarni@expressindia.com