मतपात्रिका जमा करण्याऐवजी आता थेट मतदान!

शतक पार केलेली आद्य साहित्य संस्था असा लौकिक असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मतपत्रिका जमा करण्याऐवजी आता थेट मतदान घेण्यात यावे असा प्रस्ताव विचाराधीन आहे.

शतक पार केलेली आद्य साहित्य संस्था असा लौकिक असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मतपत्रिका जमा करण्याऐवजी आता थेट मतदान घेण्यात यावे असा प्रस्ताव विचाराधीन आहे. निवडणुकीसंदर्भातील हा महत्त्वपूर्ण बदल करण्याबाबत परिषदेच्या घटना दुरुस्ती समितीमध्ये विचार सुरू आहे. अर्थात अत्यंत कमी कालावधी हाताशी असल्यामुळे परिषदेची मार्चमध्ये होणारी निवडणूक या घटना बदलानुसार होऊ शकेल का, हे प्रश्नचिन्ह कायम आहे.
निवडणूक पद्धतीमध्ये बदल करण्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होण्याची शक्यता असून या निर्णयामुळे परिषद दोन पावले मागे तर येत नाही ना, असा मुद्दा काही आजीव सभासदांनी उपस्थित केला आहे. तर, हा बदल कार्यान्वित झाला, तर मोजक्या सभासदांना मतदानासाठी हजर करून पुन्ही तीच माणसे निवडून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा पद्धतीमध्ये नव्या लोकांना परिषदेच्या कार्यकारिणीवर काम करण्याची संधी कशी मिळणार, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित झाला आहे. मतदानाची तारीख ठरेल त्या दिवशी सर्व आजीव सभासद केवळ मतदान करण्यासाठी रिकामे कसे असू शकतील, असाही पैलू पुढे आला आहे.
परिषदेच्या घटनेनुसार पंचवार्षिक निवडणुकीसाठी आजीव सभासदांना त्यांच्या पत्त्यावर मतपत्रिका पाठविली जाते. ठरावीक मुदतीमध्ये मतदाराने आपले मतदान करून ही मतपत्रिका पुन्हा परिषदेने नियुक्त केलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे पाठवावयाची असते. मात्र, विविध पदांसाठी उभे असलेले उमेदवार हेच मतदारांकडून मतपत्रिका गोळा करून त्या परिषदेमध्ये ठेवण्यात आलेल्या मतपेटीमध्ये आणून टाकतात असा सर्वसाधारण अनुभव आहे. त्यामुळे ज्याची मतपत्रिका गोळा करण्याची क्षमता मोठी त्याच्या हाती परिषदेची सूत्रे हे या निवडणुकीतील यशाचे समीकरण ठरते. या पाश्र्वभूमीवर आता यामध्ये बदल करून मतपत्रिका जमा करण्याऐवजी थेट मतदान करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, अशी माहिती घटना दुरुस्ती समितीचे निमंत्रक प्रा. सु. प्र. कुलकर्णी यांनी दिली.
घटना दुरुस्ती समितीच्या पाच बैठकांमध्ये वेगवेगळ्या तरतुदींवर सविस्तर चर्चा झाली असून घटना दुरुस्तीचे ७० टक्के काम झाले आहे. जुलैमध्ये समितीची आणखी एक बैठक होणार असून त्यामध्ये मसुदा अंतिम केला जाणार आहे. घटना दुरुस्तीच्या या बदलांसंदर्भात आजीव सभासदांच्या सूचना आणि हरकती मागविण्यात येणार आहेत. त्याचा विचार करून तयार करण्यात आलेल्या अंतिम मसुद्याला आधी परिषदेच्या कार्यकारिणीची आणि त्यानंतर सर्वसाधारण सभेची मान्यता घेतल्यानंतर हे बदल कार्यान्वित होऊ शकतील. त्यामुळे मार्चमधील पंचवार्षिक निवडणूक या बदलानुसार होऊ शकेल, असा विश्वास कुलकर्णी यांनी व्यक्त केला. परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोशाध्यक्ष सुनील महाजन, पां. के. दातार आणि अॅड. जे. जे. कुलकर्णी यांचा घटना दुरुस्ती समितीमध्ये समावेश आहे, असेही त्यांनी सांगितले.
….
घटना दुरुस्तीमधील महत्त्वाचे बदल
– परिषदेच्या जिल्हा प्रतिनिधींसाठी संबंधित जिल्ह्य़ामध्येच थेट मतदान
– कार्याध्यक्षांच्या जोडीला सहकार्याध्यक्ष या नव्या पदाची निर्मिती
– दैनंदिन प्रशासकीय कामकाज पाहण्यासाठी एक आणि घटनेतील तरतुदींची पूर्तता करण्याच्या दृष्टीने काम करणारा दुसरा अशी दोन प्रमुख कार्यवाहांच्या कामाची विभागणी

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Maharashtra sahitya parishad election change process

ताज्या बातम्या