पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषद निवडणुकीत आरोप, प्रत्यारोपांबरोबरच १६ हजार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळे हातखंडे आजमावण्यात येत आहेत.
‘गेल्या दहा वर्षांत ‘मसाप’चा कारभार हाती असलेल्या विद्यमान पदाधिकाऱ्यांनी मतदारयादीत घोटाळा केला. केवळ सोयीच्या माणसांची नावे यादीत समाविष्ट केली,’ असे आरोप करून विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या परिवर्तन उत्कर्ष आघाडीविरोधात साहित्य संवर्धन आघाडीने रान पेटवले. तसेच, आजीव सभासदांना मतदारयादीत आपले नाव शोधता यावे म्हणून संकेतस्थळाची निर्मितीही या आघाडीने केली आहे.
आजीव सभासदांची वैयक्तिक माहिती खासगी संकेतस्थळावर जाहीर करणे नियमबाह्य असल्याचा आरोप परिवर्तन उत्कर्ष आघाडीने केला असून, प्रत्येक आजीव सभासदापर्यंत पोहोचण्यासाठी थेट संपर्कावर भर देत असल्याचे विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या आघाडीचे प्रमुख विनोद कुलकर्णी यांनी सांगितले.
दहा वर्षांत निवडणूक न झाल्याने आजीव सभासदांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करून मतदारयादीत पारदर्शकता आणण्यासाठी साहित्य संवर्धन आघाडीने ‘sahityasa.com’ हे संकेतस्थळ विकसित केले. त्यावर आजीव सभासदांना मतदारयादीतील आपले नाव, मतदार क्रमांक आणि पत्त्याची माहिती सहज आणि तत्काळ पाहता येणार असल्याची माहिती या आघाडीचे उमेदवार प्रसाद मिरासदार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. आघाडीचे उमेदवार सुनील महाजन, कुणाल ओंबासे या वेळी उपस्थित होते.
मिरासदार म्हणाले, ‘महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये सुमारे १६ हजार आजीव सभासद आहेत. मात्र, गेल्या अकरा वर्षांत मतदारयादी अद्ययावत करण्यात आली नाही. त्यामुळे अनेक सभासदांना या निवडणुकीची माहितीच नाही. त्यांच्यात आपले नाव मतदारयादीत आहे की नाही, याबाबतीतही संभ्रम आहे. या अडचणी दूर करण्यासाठी हे संकेतस्थळ तयार करण्यात आले. त्यावर पिनकोड, नाव किंवा मोबाइल क्रमांक टाकून आजीव सभासदांना मतदारयादीतील आपली संपूर्ण माहिती पाहता येणार आहे. तसेच, आडनावानुसार मतदारयादी, मतदार क्रमांक आणि पत्त्याची तपासणी करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.’ साहित्य संवर्धन आघाडीच्या सर्व उमेदवारांची सविस्तर माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘मतदार यादीत तांत्रिक त्रुटी आहेत. मात्र, त्याकडेच लक्ष वेधून निवडणूक लढविण्याचा प्रयत्न विरोधकांकडून करण्यात येत आहे. या त्रुटी दूर करण्यासाठी काय करायला हवे, यावर विचार व्हायला हवा. याउलट निवडूक हरल्यानंतर त्यावर आक्षेप घेता यावा म्हणून या त्रुटींवरच विरोधक बोलत आहेत,’ असे विनोद कुलकर्णी यांनी सांगितले.
‘विनोद कुलकर्णी यांचेच नाव दोनदा’
परिवर्तन उत्कर्ष आघाडी पॅनेलचे प्रमुख विनोद कुलकर्णी यांचे नाव ‘मसाप’च्या मतदारयादीत दोनदा नोंद असल्याचा दावा महाराष्ट्र साहित्य परिषद संरक्षण कृती समितीने केला आहे. या संदर्भात निवडणूक अधिकारी प्रताप परदेशी यांच्याकडे तक्रार केल्याचे समितीचे कार्याध्यक्ष धनंजय कुलकर्णी आणि निमंत्रक शशांक महाजन यांनी निवेदनाद्वारे कळवले.
‘कुलकर्णी यांचे नाव सातारा आणि पुणे या दोन्ही याद्यांमध्ये आहे. त्यांना दोन मतपत्रिका पाठवणार का? कुलकर्णी यांना या दोन पत्त्यांवरची आधार कार्ड मतदार नोंदणीसाठी कशी उपलब्ध झाली? कुलकर्णी यांनी उमेदवारी अर्ज भरताना कोणते आधार कार्ड दाखल केले? उमेदवारी अर्जाची छाननी करताना याकडेही लक्ष देण्यात आले नाही का? चौकशीनंतर विनोद कुलकर्णी यांची उमेदवारी रद्द करणार का? मतदारयादीतील दुबार, मृत आणि पत्ताबदल मतदारांचे बनावट मतदान रोखण्यासाठी काय उपाययोजना करणार?’ असे सवाल धनंजय कुलकर्णी यांनी उपस्थित केले.
येत्या दोन दिवसांत निवडणूक अधिकाऱ्यांकडे साहित्य परिषदेच्या मतदारयादीतील मृत आणि दुबार मतदारांची माहिती देण्यात येईल. त्यावर निवडणूक अधिकारी कारवाई करतील, अशी अपेक्षा आहे. – सुनील महाजन, उमेदवार, साहित्य संवर्धन आघाडी.
साताऱ्यातील यादीत नाव होते. ते पुण्यातील पत्त्यावर स्थलांतरित केले. मात्र, तांत्रिक चुकीमुळे साताऱ्याच्या यादीतील नाव वगळण्याचे राहिले असावे. तसेच, मतदारयादीत नाव दोन वेळा आहे, म्हणून दोन वेळा मतदान करता येत नाही. – विनोद कुलकर्णी, उमेदवार, परिवर्तन उत्कर्ष आघाडी.
