पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणूक रिंगणातील साहित्य संवर्धन आघाडीने मंगळवारी वचननामा प्रसिद्ध करत साहित्य चळवळ सक्षम करण्याचे आश्वासन दिले. परिषदेच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या मराठी भाषेच्या परीक्षांना शासनाची मान्यता, साहित्य परिषदेच्या वास्तूसाठी अधिक विस्तीर्ण जागा मिळावी म्हणून राज्य शासनाकडे पाठपुरावा, आजीव सदस्यांना ग्रंथप्रकाशन आणि अन्य उपक्रमांसाठी अत्यल्प शुल्कात सभागृह, अशी आश्वासने आघाडीकडून जाहीरनाम्यात देण्यात आली.

साहित्य आणि वाचन चळवळीच्या सक्षमीकरणासाठी साहित्य संवर्धन आघाडीचे उमेदवार योगेश सोमण, स्वाती महाळंक, प्रदीप निफाडकर यांनी पत्रकार परिषदेत विविध उपक्रम जाहीर केले. हा आमचा वचननामा आहे, असे सांगून गेल्या काही वर्षांपासून ‘मसाप’ची सूत्रे हाती असलेले पदाधिकारी मनमानी कारभार करत असल्याची टीकाही त्यांनी केली.

सोमण म्हणाले, ‘महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कारभार घटनात्मक चौकटीत, पारदर्शक पद्धतीने आणि सदस्याभिमुख पद्धतीने चालवला जाईल. दरवर्षी एका जिल्ह्यात विभागीय साहित्य संमेलन आयोजित करून स्थानिक लेखकांना दर्जेदार लेखनासाठी प्रेरणा देणे आणि त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, युवा लेखकांना योग्य दिशा मिळावी यासाठी लेखन कार्यशाळा, संवाद सत्रे आणि मार्गदर्शन शिबिरे शाखांच्या माध्यमातून राबवली जातील.’

‘जिथे मराठी तेथे साहित्य परिषद’ या संकल्पनेतून जगभरातील मराठी माणसाला मराठीशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. साहित्य निर्मिती करताना लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवणे, परप्रांतीयांमध्ये मराठीविषयी आस्था निर्माण करणे आणि लेखक, वाचक, प्रकाशक, वितरक व विक्रेते या सर्व घटकांसाठी सक्रिय भूमिका घेण्याचा निर्धार सोमण यांनी व्यक्त केला.

निफाडकर म्हणाले, ‘परिषदेच्या आर्थिक स्वावलंबनासाठी उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे. परिषदेच्या विविध जिल्हा शाखा सक्षम करण्यासाठी दरवर्षी ठराविक अर्थसाह्य देण्याचे धोरण राबवले जाईल. या निधीच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर साहित्यिक उपक्रम, वाचन चळवळ आणि सांस्कृतिक कार्यक्रम नियमितपणे करण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे.’

दरम्यान, ‘साहित्य पत्रिका’ पुन्हा एकदा मुद्रित स्वरूपात प्रत्येक आजीव सदस्यापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन साहित्य संवर्धन आघाडीने जाहीरनाम्यातून दिले आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तो सार्थ ठरेल असे कृतीशील कार्यक्रम राबवले जातील, असेही स्पष्ट करण्यात आले.

‘१०० पुस्तक महोत्सव’

‘पुणे पुस्तक महोत्सवा’ला मिळणाऱ्या प्रतिसादाचा उल्लेख करत योगेश सोमण यांनी शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने परिषदेच्या कार्यक्षेत्रात ‘१०० पुस्तक महोत्सवां’चे आयोजन करणार असल्याचे आश्वासन साहित्य संवर्धन आघाडीकडून दिले.

‘हे संघाचे पॅनल नाही’

आमचे पॅनेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे किंवा संघातर्फे पुरस्कृत नाही. या पॅनलच्या माध्यमातून समविचारी साहित्यप्रेमी निवडणूक लढवत आहेत. साहित्य चळवळ सक्षम करण्यासाठी हा वचननामा प्रसिद्ध करत आहोत, असे योगेश सोमण यांनी सांगितले.