‘देवाघरचे ज्ञात कुणाला, विचित्र नेमानेम’ या नाट्यपदाची मोहिनी रसिकांवर कायम आहे. हे नाट्यपद आठवण्याचे कारण म्हणजे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे निकाल. ‘याचसाठी केला होता अट्टाहास’ असे म्हणत विजयाची खात्री असलेल्या परिषदेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांचा ‘शेवटचा दिस’ काही गोड झाला नाही. दहा वर्षांची तपश्चर्या फळाला येण्याऐवजी परिवर्तनाच्या सुप्त लाटेचा फटका बसला. परिणामी, ‘कुणी रखडती धुळीत आणिक कुणास लाभे हेम’ या काव्यपंक्तीची प्रचिती प्रस्थापित पदाधिकाऱ्यांना आली.
विद्यमान पदाधिकाऱ्यांनी बांधलेली परिवर्तन उत्कर्ष आघाडी आणि विरोधकांची साहित्य संवर्धन आघाडी या दोन पॅनेलमध्ये प्रामुख्याने ही निवडणूक रंगली. जोरदार आरोप-प्रत्यारोपही झाले. परिवर्तन उत्कर्ष आघाडीला अतिआत्मविश्वास होता, तर नेहमी निवडणुकीच्या तयारीत असलेल्या ‘परिवारा’चा साहित्य संवर्धन आघाडीला ‘आशीर्वाद’ पहिल्यापासून होता. त्यामुळे निवडणुकीचे ‘सूक्ष्म नियोजन’ साहजिकच होते. दशकभरापूर्वी झालेल्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलेले योगेश सोमण आणि सुनील महाजन या वेळी विजयी झाले, ते या ‘नियोजना’मुळेच.
करोना संपल्यानंतर साऱ्या जगाचे व्यवहार सुरळीत झाल्यावरही करोनाचेच निमित्त पुढे करून परिषदेच्या कार्यकारिणीने घटनेनुसार निवडणुकाला सामोरे जाण्याऐवजी वार्षिक सर्वसाधारण सभेत चक्क पाच वर्षांची मुदतवाढ घेतली होती. ‘कार्यकारिणी उत्तम काम करत असली, तरी दोन वर्षांत निवडणूक न घेतल्यास मी राजीनामा देईन,’ असे अध्यक्ष डाॅ. रावसाहेब कसबे यांनी म्हटले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून कार्यकारिणीने पाच वर्षांचा कालावधी पूर्ण केलाच.
वाङ्मयीन कार्यक्रमांमध्ये साहित्यावर भाष्य करण्याऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वारंवार केलेली टीका, त्याचप्रमाणे सातारा येथे नुकत्याच झालेल्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या मनोगतातून मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांना केलेले ‘आवाहन’ ‘परिवारा’तील मतदारांना रुचले नाही, असे दिसते. त्याचप्रमाणे, परिषदेच्या शाखांकडे केलेले दुर्लक्ष आदी गोष्टींचा फटका निवडणुकीत बसला.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहाचे वातानुकूलन सुविधेसह केलेले नूतनीकरण, मराठीच्या अभिजात दर्जासाठी केलेली आंदोलने, पंतप्रधानांना सह्यांचे निवेदन पाठविण्याबरोबरच शासकीय पातळीवर केलेला पाठपुरावा, मर्ढे (जि. सातारा) येथील बा. सी. मर्ढेकर आणि नाटककार वसंत कानेटकर यांच्या वास्तूचे केलेले नूतनीकरण अशा विविध कामांमुळे मतदार आपल्याच परिवर्तन उत्कर्ष आघाडीला निवडून देतील, असा आत्मविश्वास विद्यमान पदाधिकाऱ्यांना होता. मात्र, त्यांच्या विरोधात असलेल्या उमेदवारांसाठी कोणत्या स्वरूपाची यंत्रणा मूकपणे कार्यरत होती, याचा सुगावाही त्यांना लागला नाही. ही यंत्रणा किती सक्षम होती याचा दाखला निवडणूक निकालानंतर मिळाला.
दहा वर्षांपूर्वीच्या निवडणुकीत पुण्यामध्ये आपल्याला दगाफटका होऊ शकतो, हे ध्यानात घेऊन तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी परिषदेचे कार्यक्षेत्र असलेल्या इतर दहा जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करून, मतपत्रिकांचे संकलन करून विजय पदरात पाडून घेतला होता. गेल्या निवडणुकीतील ही कार्यपद्धती यंदा फलद्रूप होऊ शकली नाही, हे या निवडणुकीच्या निकालाने सिद्ध केले. अर्थात, त्या निवडणुकीमध्ये सुनील महाजन आणि योगेश सोमण यांना पराभव स्वीकारावा लागला असला, तरी स्थानिक कार्यवाह पदाचे त्यांच्या आघाडीचे सहाही उमेदवार विजयी झाले होते.
या निवडणुकीसंदर्भात विद्यमान कार्यकारिणीने कमालीची गुप्तता राखली. त्यामुळे अन्य जिल्ह्यांमध्ये असलेल्या परिषदेच्या शाखांतील केवळ परिषदेवर काम करणाऱ्या प्रतिनिधींनाच कल्पना असल्याने पुण्यातील पदाधिकाऱ्यांना अनुकूल ठरणाऱ्या उमेदवारांचेच अर्ज दाखल झाले. परिणामी, पुणे वगळता अन्य जिल्ह्यांमध्ये असे अनुकूल उमेदवार नगरसेवकांच्या धर्तीवर ‘बिनविरोध’ निवडून आले.
नव्या कार्यकारिणीला आता शंभरावे साहित्य संमेलन दिमाखात पार पाडण्याचे आव्हान असेल. अर्थात, या निवडणुकीत साहित्य संवर्धन आघाडीला मदत करणारे राजेश पांडे पुण्यातच भव्य पुणे पुस्तक महोत्सव भरवत असल्याने आयोजनाबाबत पदाधिकारी निश्चिंत असतील. तसेच, सुनील महाजन यांना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यपद्धतीचा अनुभव आहे, हीसुद्धा जमेची बाजू ठरेल.
vidyadhar.kulkarni@expressindia.com
