पुणे : आद्य साहित्य संस्था असा लौकिक असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीमध्ये दशकभराने सत्तापालट झाला आहे. पुण्यात होणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजन सुरू असतानाच विद्यमान कार्यकारिणीचा समावेश असलेल्या परिवर्तन उत्कर्ष आघाडीला पराभवाचा धक्का बसला आहे. अध्यक्षपदी योगेश सोमण, प्रमुख कार्यवाहपदी स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्षपदी प्रदीप निफाडकर या तीन प्रमुख पदाधिकाऱ्यांसह स्थानिक कार्यवाहपदाच्या सातपैकी चार जागांवर साहित्य संवर्धन आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत.

साहित्य संस्थांची आद्य संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अटीतटीच्या निवडणुकीत संस्थेच्या अध्यक्षपदी साहित्य संवर्धन आघाडीचे उमेदवार लेखक-नाटककार योगेश सोमण, प्रमुख कार्यवाहपदी पत्रकार स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्षपदी गज़लकार प्रदीप निफाडकर यांनी रविवारी विजय मिळवला. या निवडणुकीत परिषदेचे कार्याध्यक्ष आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार आणि कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांचा पराभव झाला. सोमण हे आता साहित्य महामंडळाचेही अध्यक्ष असतील. त्याचबरोबरीने महाळंक आणि निफाडकर हेदेखील साहित्य महामंडळाचे पदाधिकारी असतील.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल मतमोजणी संपल्यानंतर रविवारी रात्री उशिरा जाहीर झाला. निवडणुकीत उत्कर्ष परिवर्तन आणि साहित्य संवर्धन या दोन आघाड्यांमध्ये चुरस होती. स्थानिक कार्यवाह या सात पदांच्या निवडणुकीत सुनील महाजन, सुनेत्रा मंकणी, प्रसाद मिरासदार, डाॅ. नितीन संगमनेरकर (साहित्य संवर्धन) तसेच अंजली कुलकर्णी, माधव राजगुरू आणि डॉ. आशुतोष जावडेकर (परिवर्तन उत्कर्ष ) यांचा विजय झाला. निवडणूक मंडळाचे अध्यक्ष ॲड. प्रताप परदेशी यांच्यासह संजीव खडके आणि गिरीश केमकर यांनी रात्री उशिरा निकाल जाहीर केला.

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यक्षेत्र असलेल्या पुण्यासह अकरा जिल्ह्यांतील १६ हजार ६०७ आजीव सभासद या निवडणुकीचे मतदार होते. त्यापैकी १० हजार ९०० सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणीत परिवर्तन उत्कर्ष आणि साहित्य संवर्धन या दोन गटांमध्ये अखेरपर्यंत चुरस पाहायला मिळाली.

करोनाचे निमित्त पुढे करून महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी २०२१ मध्ये झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निवडणुकीला सामोरे जाण्याऐवजी पाच वर्षांसाठी मुदतवाढ घेतली. यापूर्वी साहित्य परिषदेची निवडणूक २०१६ मध्ये झाली होती. मुदतवाढीमुळे विद्यमान कार्यकारिणीकडे दहा वर्षे परिषदेच्या कारभाराची सूत्रे होती.

मतमोजणीसाठी पोलीस बंदोबस्त

मतमोजणीसाठी सकाळपासूनच पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यात विश्रामबाग पोलीस ठाण्याचे तीन पोलीस आणि चार होमगार्ड यांचा समावेश होता. प्रत्येक फेरीदरम्यान कुणाला किती मते पडली हे शेवटच्या क्षणापर्यंत गुलदस्यात ठेवण्यात आले होते. सुरुवातीला पुणे जिल्हा आणि शहर प्रतिनिधी पदासाठीची मतमोजणी घेण्यात आली. मतमोजणीला विलंब लागला. सुरुवातीपासून साहित्य संवर्धन आघडीचे वर्चस्व मतमोजणीत दिसून आले. शेवटच्या काही फेऱ्यांत मताधिक्य कमी झाल्याने उमेदवारांची धडधड वाढली. पण, त्याचा निकालावर परिणाम पडला नाही.

महाराष्ट्र साहित्य परिषद

एकूण मतदान – १०,९०१

वैध मतदान – १०,७१३

अवैध मतदान – १८८
अध्यक्ष

विजयी – योगेश सोमण ५,३६५

पराभूत – मिलिंद जोशी ५,३२०

प्रमुख कार्यवाह

विजयी – स्वाती महाळंक ५,४१४

पराभूत – सुनीताराजे पवार ५,२८५

कोषाध्यक्ष

विजयी – प्रदीप निफाडकर ५,५३६

पराभूत – विनोद कुलकर्णी ५,१८६

………………………………..

स्थानिक कार्यवाह

सुनील महाजन

अंजली कुलकर्णी

सुनेत्रा मंकणी

प्रसाद मिरासदार

माधव राजगुरू

नितीन संगमनेरकर

आशुतोष जावडेकर
…………………….

पुणे जिल्हा प्रतिनिधी

राजन लाखे

पुरुषोत्तम काळे

प्रभाकर ओव्हाळ

(तिघेही परिवर्तन उत्कर्ष आघाडीचे उमेदवार)
…………………………………………..

जवळपास दहा वर्षांनंतर साहित्य संवर्धन आघाडी ही समविचारी साहित्यप्रेमी आणि वाचकांच्या आघाडीला महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश मिळाले आहे. आमच्यासाठी काम करणारे हजारो ज्ञात-अज्ञात हात आणि ज्यांना खऱ्या अर्थाने परिवर्तन हवे होते त्यांनी ते घडवून आणले आहे. हा विजय त्या सगळ्यांचा आहे. त्या सर्वांना मी हा विजय समर्पित करतो. – योगेश सोमण, प्रमुख, साहित्य संवर्धन आघाडी