पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीला शनिवारी थेट राजकीय रंग चढला. ‘साहित्य संवर्धन आघाडी’ मुख्यमंत्र्यांचे नाव आणि सरकारी यंत्रणेचा वापर करून ‘मसाप’ ताब्यात घेत असल्याचा आरोप गेली काही वर्षे ‘मसाप’ची सूत्रे ताब्यात असलेल्या पदाधिकार्‍यांच्या ‘परिवर्तन उत्कर्ष आघाडी’ने केला. याच्या पुष्ट्यर्थ ‘साहित्य संवर्धन आघाडी’च्या बैठकीचे ध्वनिचित्रमुद्रणही सादर केले. परंतु याप्रकरणी ‘परिवर्तन उत्कर्ष आघाडी’चे उमेदवार विनोद कुलकर्णी यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने वाद वाढण्याची चिन्हे आहेत.

‘परिवर्तन उत्कर्ष आघाडी’ने शनिवारी पुण्यात पत्रकार परिषद आयोजित केली होती. या वेळी या आघाडीचे उमेदवार मिलिंद जोशी, विनोद कुलकर्णी, सुनिताराजे पवार, शिरीष चिटणीस, अंजली कुलकर्णी, मृणालिनी कानिटकर-जोशी, वि. दा. पिंगळे, माधव राजगुरू, प्रमोद आडकर, राजन लाखे, राजीव बर्वे, डॉ. सतीश देसाई आदी उपस्थित होते.

‘सातार्‍यातील साहित्य संमेलनामध्ये ‘साहित्य संस्थेत सरकार हस्तक्षेप करणार नाही,’ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मात्र, एका महिन्यातच मुख्यमंत्र्यांच्या नावाचा वापर करून साहित्य परिषदेच्या निवडणुकीत प्रचार केला जात आहे. पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक, भाजपचे नेते राजेश पांडे यांनी सरकारी यंत्रणांचा वापर करून मतदारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, मतदान कसे ‘मॅनेज’ करावे, याचेही धडे ऑनलाइन बैठकीत दिले,’ असा आरोप कुलकर्णी यांनी केला.

निवडणुकीत हस्तक्षेप करणार्‍या या प्रकाराची गंभीर दखल घेऊन पांडे यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची मागणी निवडणूक अधिकार्‍यांकडे केल्याचेही कुलकर्णी यांनी स्पष्ट केले. तसेच ‘कामांबाबत पुढील पत्रकार परिषदेत जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे,’ असे कुलकर्णी आणि जोशी यांनी नमूद केले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत अभिजात मराठी भाषेतील साहित्य संवर्धनाविषयी ऊहापोह होणे अपेक्षित आहे. याच प्रकारचा प्रचार साहित्यप्रेमी मतदारांना अपेक्षित आहे. परंतु, विरोधक उणीदुणी काढत, यात राजकारण आणत आहेत. – राजेश पांडे, भाजप नेते तथा पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक.

कुलकर्णींविरोधात सायबर पोलिसांत तक्रार

‘साहित्य संवर्धन आघाडी’ने प्रचारासाठी आयोजित केलेल्या खासगी ऑनलाइन बैठकीचे ध्वनिचित्रमुद्रण करून ते प्रसारित केल्याप्रकरणी ‘परिवर्तन उत्कर्ष आघाडी’चे प्रमुख विनोद कुलकर्णी यांच्याविरोधात जळगाव येथील सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कुलकर्णी यांनी बदनामी केली असून, गोपनीयतेच्या अधिकाराचे उल्लंघन केल्याचा आरोप बैठकीच्या आयोजकांनी केला. राजेंद्र लखीचंद नन्नावरे यांनी सायबर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. जळगाव सायबर गुन्हे शाखा या प्रकरणाची चौकशी करत आहे.

ध्वनिचित्रमुद्रणाद्वारे दबावाचा प्रयत्न

‘विनोद कुलकर्णी आणि त्यांच्या प्रतिनिधींनी विरोधी उमेदवारांवर दबाव आणला. निवडणूक बिनविरोध करून आपली बेकायदा सत्ता कायम ठेवण्यासाठी आतोनात प्रयत्न केले. ते महाराष्ट्र साहित्य परिषदेची इमारत आपल्या निवडणूक प्रचार कार्यालयाप्रमाणे वापरतात. आता विरोधी आघाडीच्या उमेदवारांच्या खासगी बैठकीचे चित्रण सार्वजनिक करून दबावाचा नवा प्रयत्न केला,’ असे आरोप महाराष्ट्र साहित्य परिषद संरक्षण कृती समितीच्या वतीने धनंजय कुलकर्णी, शशांक महाजन यांनी दुपारी पत्रकार परिषदेत केले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत अभिजात मराठी भाषेतील साहित्य संवर्धनाविषयी ऊहापोह होणे अपेक्षित आहे. याच प्रकारचा प्रचार साहित्यप्रेमी मतदारांना अपेक्षित आहे. परंतु, विरोधक उणीदुणी काढत, यात राजकारण आणत आहेत.  – राजेश पांडे, भाजप नेते तथा पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक.

मुख्यमंत्र्यांच्या नावाचा वापर करून साहित्य परिषदेच्या निवडणुकीत प्रचार केल्याचा आरोप होत आहे. यावरून आरोप-प्रत्यारोप रंगले असताना, हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले आहे.