पुणे : राज्यातील शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना देण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी राज्यातील आयडॉल शिक्षकाची यादी जाहीर केली आहे. यंदा ४ हजार ४८४ शिक्षकांची ‘आयडॉल शिक्षक’ म्हणून निवड करण्यात आली असून, यादीतील सर्वाधिक ४८७ शिक्षक पुणे जिल्ह्यातील असल्याचे दिसून येते.
राज्यभरातील गुणवत्तापूर्ण अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने आयडॉल शिक्षक, आयडॉल शाळांची निवड करण्याचा निर्णय गेल्यावर्षी घेतला. राज्यातील शिक्षणक्षेत्रात उत्कृष्ट आणि नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या शिक्षकांना ‘आयडॉल शिक्षक’ म्हणून निवडून त्यांच्या अनुभवाचा, कौशल्याचा उपयोग संपूर्ण शिक्षण विभागाला करून देण्याचा उद्देश या उपक्रमामागे असल्याचे नमूद करण्यात आले होते. आयडॉल शिक्षकांना राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावर आयोजित केली जाणारी विविध प्रशिक्षणे, कार्यशाळा आणि चर्चासत्रांमध्ये सहभागी करून घेण्याचा, आवश्यकतेनुसार त्यांना ‘तज्ज्ञ मार्गदर्शक’ म्हणून नियुक्त करण्याचाही निर्णय घेण्यात आला होता. या अनुषंगाने, शैक्षणिक वर्ष २०२५-२६मध्ये पहिल्यांदा जिल्हास्तरावर प्रत्येकी दहा या प्रमाणे राज्यातील ४४२ आयडॉल शिक्षक निवड करण्यात आली होती.
आता शैक्षणिक वर्ष २०२६-२७साठी एससीईआरटीने
आयडॉल शिक्षकांची यादी प्रसिद्घ केली आहे. त्यात राज्यातील विविध जिल्ह्यांतील शिक्षकांचा समावेश आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांना स्थान मिळाले आहे. जिल्हा परिषद, महानगरपालिका, अनुदानित शाळांतील शिक्षकांनाही समाविष्ट करण्यात आले आहे. सर्वाधिक शिक्षक पुणे जिल्ह्यातील आहेत. पुणे जिल्ह्यातील ४८७ शिक्षकांनंतर सोलापूरमधील २६०, नाशिकमधील २४५, अहिल्यानगरमधील २३७ आणि सातारा जिल्ह्यातील २२६ शिक्षकांची निवड झाली आहे. तर गडचिरोलीतील ४९, गोंदियातील ४६, भंडाऱ्यातील ३५, नंदुरबारमधील २५, परभणीतील १७ आणि वाशिममधील १६ शिक्षकांचा यादीत समावेश असल्याचे दिसून येते.
आयडॉल शिक्षक संख्येत एकाच वर्षात झपाट्याने वेड
गेल्यावर्षी पहिल्यांदा आयडॉल शिक्षकांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. तर दुसऱ्याच वर्षी आयडॉल शिक्षकांची संख्या ३३२वरून थेट ४ हजारांवर पोहोचली आहे. त्यामुळे आयडॉल शिक्षकांंमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून येते.
