पुणे : राज्यातील २०२६-२७ शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दोन महिने उलटूनही पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना कृतिपत्रिका मिळालेल्या नाहीत. विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे सुलभ आकलन, सरावासाठी कृतिपत्रिका महत्त्वाच्या असतात.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तकनिर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडून (बालभारती) पाठ्यपुस्तके तयार करण्यात येतात. तर, सेतू अभ्यासक्रम आणि कृतिपत्रिका तयार करण्याचे काम महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे (एससीईआरटी) आहे. पाठ्यपुस्तकातील आशय केवळ वर्गातील अध्ययन-अध्यापनापुरता मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांना विविध कृती, प्रश्न, उपक्रम आणि सरावातून तो समजावा, हा या कृतिपत्रिकांचा उद्देश आहे.

गेल्या वर्षी इयत्ता पहिली, तर यंदा दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावी या इयत्तांसाठी नव्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके लागू करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या विचारक्षमतेला चालना देणे, निरीक्षणशक्ती विकसित करणे आणि अभ्यासाबाबत उत्सुकता निर्माण करण्यासाठी या कृतिपत्रिका महत्त्वपूर्ण ठरतात.

विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे आकलन सुलभपणे होणे, त्याचा सराव करता येण्यासाठी कृतिपत्रिका महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे कृतिपत्रिका तयार करणे, त्यांचे विद्यार्थ्यांना वितरण करण्याची प्रक्रिया वेळेत होणे आवश्यक होते. ते न झाल्यामुळे अडचणी येत आहेत. – महेंद्र गणपुले, माजी मुख्याध्यापक

‘समग्र शिक्षण’अंतर्गत कृतिपत्रिका तयार करण्यात येत आहेत. या कृतिपत्रिका तयार करण्यासाठी ७० टक्के कार्यशाळा झाल्या आहेत. कृतिपत्रिकांसाठी आवश्यक निधी शासनाकडून नुकताच मंजूर झाला आहे. आता उर्वरित कार्यशाळा पूर्ण करून कृतिपत्रिका अंतिम करण्यात येतील. त्यानंतर त्यांची छपाई करण्यात येणार आहे. – डॉ. हेमंत वसेकर, संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद