पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहे. ही परीक्षा २६ एप्रिल रोजी राज्यभरातील ७ हजार ७९३ परीक्षा केंद्रांवर होणार असून, चौथी आणि सातवीच्या मिळून एकूण ११ लाख ५५ हजार ७६७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.

परीक्षा परिषदेच्या उपायुक्त निशादेवी बंडगर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे परीक्षेच्या प्रवेशपत्र उपलब्धतेबाबतची माहिती दिली. चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचे प्रवेशपत्र परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावरील शाळा लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. मुख्याध्यापकांनी प्रवेशपत्राची मुद्रितप्रत घेऊन ती विद्यार्थ्यांना वितरित करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

परीक्षा परिषदेने दिलेल्या आकडेवारीनुसार यंदा चौथीच्या परीक्षेसाठी ६ लाख ९४ हजार ४७, सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ४ लाख ६१ हजार ७२० अशा एकूण ११ लाख ५५ हजार ७६७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. चौथीची परीक्षा ४ हजार ५६३, तर सातवीची परीक्षा ३ हजार २३० परीक्षा केंद्रांवर आयोजित केली जाणार आहे.

दरम्यान, राज्यातील गुणवान विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, स्पर्धात्मकतेसाठी प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात येते. पूर्वी ही परीक्षा चौथी आणि सातवी या इयत्तांसाठी घेतली जात होती. मात्र, शिक्षण हक्क कायद्यातील (आरटीई) तरतुदी लक्षात घेऊन २०१६-१७पासून ही परीक्षा पाचवी आणि आठवी या वर्गांसाठी लागू करण्यात आली. पाचवी आणि आठवीला शिष्यवृत्ती परीक्षा लागू केल्यापासून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये बदल करून पूर्वीप्रमाणेच चौथी आणि सातवी या वर्गांसाठी परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला.

यंदा पाचवी, आठवीसह चौथी आणि सातवी या इयत्तांसाठीही स्वतंत्रपणे शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचे जाहीर केले. त्यानुसार राज्य परीक्षा परिषदेतर्फे पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा २२ फेब्रुवारी घेण्यात आली. तर चौथी आणि सातवीची परीक्षा २६ एप्रिल रोजी घेतली जाणार आहे. परीक्षेच्या वेळापत्रकानुसार सकाळी अकरा ते बारा या वेळेत प्रथम भाषा व गणित या विषयाची, तर दुपारी दोन ते साडेतीन या वेळेत तृतीय भाषा व बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे यंदा एकाच वर्षांत चौथी, पाचवी, सातवी, आठवी या इयत्तांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा होणार आहेत.