पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि अनुदानित शाळांतील दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी संकलित मूल्यमापन चाचणी १ (पॅट परीक्षा) यंदा लांबणीवर पडली आहे. यंदा ही परीक्षा दिवाळी सुटीनंतर नोव्हेंबरअखेरीस घेतली जाणार आहे.
विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती संपादणूक पडताळणे, अध्ययन-अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास मदत करणे, अध्ययनात मागे असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे नेण्याच्या दृष्टिकोनातून कृती कार्यक्रम तयार करून अंमलबजावणी करणे या उद्देशाने नियतकालिक मूल्यमापन चाचणी घेण्यात येतात. त्यानुसार पहिल्या सत्राच्या अखेरीस संकलित मूल्यमापन चाचणी १ आणि दुसऱ्या सत्राच्या अखेरीस संकलित मूल्यमापन चाचणी २ या परीक्षा घेतल्या जातात. मात्र, आतापर्यंत संकलित मूल्यमापन चाचणी १ कधी आयोजित केली जाणार याबाबत काहीच सूचना देण्यात आलेल्या नसल्याने शाळास्तरावर संभ्रम निर्माण झाला होता.
या पार्श्वभूमीवर, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या सहसंचालक डॉ. कमलादेवी आवटे यांनी याबाबतच्या सूचना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यमापन चाचण्यांचे आयोजन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या अंतर्गत संकलित मूल्यमापन चाचणी १ नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात, तर संकलित मूल्यमापन चाचणी २ ही परीक्षा एप्रिल २०२७मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. संकलित मूल्यमापन चाचणी १ एकूण दहा माध्यमांत घेतली जाणार आहे. त्यासाठी प्रथम भाषा, गणित आणि तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या चाचण्या राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून शाळांना विद्यार्थिनिहाय पुरवण्यात येणार आहेत. शालेय वेळापत्रकानुसार सकाळ सत्र किंवा दुपार सत्रात परीक्षा घेण्यात याव्यात. लेखी परीक्षेनंतर तोंडी परीक्षा घ्यावी. या चाचणी परीक्षेचा विद्यार्थ्यांवर अतिरिक्त ताण देण्यात येऊ नये, असे नमूद करण्यात आले आहे.
यंदा शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर एससीईआरटीकडून आयोजित केली जाणारी पायाभूत चाचणीही घेण्यात आली नाही. पहिल्या सत्रअखेरीस दिवाळीपूर्वी होणाऱ्या संकलित मूल्यमापन चाचणी १च्या आयोजनाबाबत काहीच सूचना नसल्याने संभ्रमाची स्थिती होती. त्या अनुषंगाने पत्रव्यवहारही करण्यात आला होता. आता दिवाळी सुटीनंतर नोव्हेंबरअखेरीस परीक्षा घेतली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, ही परीक्षा दिवाळीपूर्वीच होणे गरजेचे होते. – तानाजी माने, कार्याध्यक्ष, मुख्याध्यापक महामंडळ
