पुणे : राज्यातील शाळा सुरू होण्यास जेमतेम आठवडा बाकी असताना शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबतच्या निर्णयात बदल केला आहे. त्यानुसार आता विदर्भातील शाळा २२ जूनपासून सुरू केल्या जाणार असून, उर्वरित राज्यभरातील शाळा १५ जूनपासूनच सुरू होणार आहेत.
प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी संयुक्त परिपत्रकाद्वारे या बाबत माहिती दिली. शिक्षण विभागाने मार्चमध्ये उन्हाळी सुटी आणि शाळा सुरू करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार राज्य मंडळाशी संलग्न शाळांना २ मेपासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली. तर शैक्षणिक वर्ष २०२६-२७मध्ये विदर्भ आणि इतर सर्व विभागातील शाळा १५ जूनपासून सुरू करण्यात याव्यात, जूनमधील विदर्भातील तापमान लक्षात घेता १५ ते २९ जून या कालावधीत सकाळी सात ते पावणेबारा या वेळेत सुरू कराव्यात, ३० जूनपासून नियमित वेळेत शाळा सुरू करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.
संपूर्ण राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुटीच्या कालावधीमध्ये सुसंगतता आणि एकवाक्यता आणण्याचा उद्देश त्यामागे असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, विदर्भातील तापमान विचारात घेता विदर्भातील शाळा १५ जूनपासून सुरू करण्यास विरोध दर्शवण्यात आला होता. या निर्णयाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर, आता शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांना सूचना देण्यात आल्या आहेत. ‘अद्यापही विदर्भातील तापमान विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे केवळ विदर्भातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा २२ जूनपासून सुरू होतील. तसेच २२ ते ३० जून या कालावधीत विदर्भातील शाळा सकाळच्या सत्रात भरतील. १ जुलैपासून शाळा नियमित वेळेत भरतील. उर्वरित राज्यातील शाळा सोमवारपासून (१५ जून) नियमित वेळेत भरतील याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी,’ असे स्पष्ट करण्यात आले आहे.
