पुणे : नव्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री, मंत्री, लोकप्रतिनिधी, अधिकारी शाळांमध्ये पोहोचले. मात्र, राज्यातील अनेक शाळांमध्ये पाठ्यपुस्तके पोहोचली नाहीत. बऱ्याच ठिकाणी पाठ्यपुस्तकांची संख्या शाळेतील विद्यार्थिसंख्येच्या तुलनेत अपुरी आहे. त्यामुळे या शाळांमध्ये विद्यार्थी, शिक्षकांचे शैक्षणिक वर्ष पाठ्यपुस्तकांविनाच सुरू झाले.
विदर्भ वगळता राज्यातील उर्वरित भागांतील राज्य मंडळाशी संलग्न शाळा सोमवारी (१५ जून) सुरू झाल्या. समग्र शिक्षा योजनेंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, अनुदानित शाळांतील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात. त्या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षणमंत्र्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वितरित करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.
मात्र, राज्यातील ठिकठिकाणच्या शाळांतील शिक्षकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनेक शाळांत पाठ्यपुस्तकांचे वितरण झालेले नाही. काही शाळांमध्ये काही विषयांचीच पुस्तके मिळाली. तर, काही शाळांमध्ये विद्यार्थिसंख्येपेक्षा कमी पाठ्यपुस्तके उपलब्ध झाली. यंदा इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी, सहावी या इयत्तांना राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०नुसार नव्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके लागू करण्यात आली आहेत. त्यांपैकी तिसरी, चौथी, सहावी या इयत्तांच्या विद्यार्थ्यांना २१ दिवसांचा सेतू अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे.
हा अभ्यासक्रम राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) तयार केला आहे. ‘एससीईआरटी’ने या अभ्यासक्रमाची पीडीएफ प्रत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. मात्र, पाठ्यपुस्तकांप्रमाणेच सेतू अभ्यासक्रमाचे पुस्तकही अद्याप शाळांपर्यंत पोहोचलेले नाही. त्यामुळे सेतू अभ्यासक्रमाचे पुस्तक मिळेपर्यंत ‘पीडीएफ’च्या आधारेच काम करावे लागणार असल्याचे शिक्षकांनी नमूद केले.
