पुणे : राज्य मंडळाशी संलग्न शाळांतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा निकाल महाराष्ट्र दिनी (१ मे) जाहीर केला जाणार आहे. मात्र, यंदा या निकाल जाहीर प्रक्रियेत अभिनव बदल करण्यात आला असून, विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे वस्तुनिष्ठ आणि पारदर्शक चित्र पालकांसमोर येण्यासाठी निकालपत्रक देताना विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकाही पालकांना दाखवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी याबाबत संयुक्त परिपत्रकाद्वारे विभागीय शिक्षण उपसंचालक, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांना सूचना दिल्या आहेत. राज्य मंडळाच्या सर्व शाळांना २ मेपासून उन्हाळी सुटी जाहीर करण्यात आली आहे. त्यापूर्वी १ मे रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये नमूद केल्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याच्या वैशिष्टपूर्ण क्षमता शोधणे, ओळखणे आणि त्या विकसित करण्यासाठी प्रयत्न करणे, शिक्षक आणि पालकांनी प्रत्येक विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यास आणि अभ्यासेतर दोन्ही क्षेत्रामध्ये चालना देणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर, १ मे रोजी निकालपत्रक देताना विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पालकांच्या निदर्शनास आणण्याची कार्यवाही शाळांनी करण्याची सूचना देण्यात आली आहे.

उत्तरपत्रिका पालकांना दाखवण्याचा उद्देश काय?

उत्तरपत्रिका पालकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिल्यामुळे उत्तरपत्रिकेमध्ये नमूद केलेल्या प्रतिसादाच्या आधारे विद्यार्थ्यांची संकल्पनात्मक समज, क्षमता, कौशल्यांचे अचूक निदान करता येईल, विद्यार्थ्यांच्या अध्ययन-अध्यापनाची गरज ओळखून पालकांच्या मदतीने उपाययोजना करणे सुलभ होईल, वैयक्तिक पातळीवर उपचारात्मक अध्ययन आणि गुणवत्ता संवर्धनासाठी उपक्रम प्रभावीपणे राबवता येतील, पालक-शिक्षक यांच्यात सतत संवाद होईल, असे नमूद करण्यात आले आहे.