पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये आनंददायी आणि तंत्रज्ञानस्नेही शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी शिक्षण विभागाने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या ध्येयधोरणांना अनुसरून राज्यातील १६ हजार शाळांना ध्वनिक्षेपक प्रणाली संच (स्पीकर सेट) पुरवण्यास मान्यता देण्यात आली असून, या अंतर्गत २० कोटी ८० लाख रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ नुसार विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्याचा हक्क आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०नुसार शाळांमध्ये आनंददायी, उत्साहवर्धक, शैक्षणिकदृष्ट्या अनुकूल वातावरणात उच्च दर्जाचे शिक्षण देऊन मुलांना २१ व्या शतकातील प्रमुख कौशल्ये आत्मसात करून अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडविण्यावर भर देण्यात आला आहे. या अनुषंगाने शाळांमध्ये उत्साही आणि गुणवत्तेचे वातावरण निर्माण होण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शाळांना ध्वनिक्षेपक प्रणाली संच देण्याबाबत चर्चा करण्यात आली होती. त्यासाठीचा अभ्यास करून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना शिक्षण आयुक्तांना देण्यात आल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर, प्राथमिक शिक्षण संचालकांनी १६ हजार शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याअंतर्गत ध्वनिक्षेपक प्रणाली संच देण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला शिक्षण विभागाने प्रशाकीय मान्यता दिली आहे. त्यानुसार प्राथमिक शिक्षण संचालकांकडून ई-निविदा मागवून ध्वनिक्षेपक प्रणाली संचांची खरेदी केली जाणार आहे. निविदेमध्ये ध्वनिक्षेपक प्रणाली संचाचे डिझाइन, वाहतुकीसह पुरवठा, प्रणाली बसवणे अशा विविध बाबींचा समावेश असणे आवश्यक आहे. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने निश्चित केलेल्या कार्यपद्धती, प्रचलित नियमांनुसार ही प्रक्रिया राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शाळेत कार्यक्रम घेण्यासाठी यंत्रणा बाहेरून आणावी लागते. त्यासाठी स्वतंत्र खर्च करावा लागतो. अनेकदा त्यासाठी निधी उपलब्ध नसतो. आता शासनाकडूनच ध्वनिक्षेपक प्रणाली देण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. या प्रणालीमुळे दैनंदिन परिपाठ, अध्यापन, शाळेतील स्नेहसंमेलन, कार्यक्रमांसाठी ही प्रणाली उपयुक्त ठरेल. तसेच शाळेला खर्च करण्याची गरज राहणार नाही. – अजय काळे, शिक्षक
