पुणे : राज्यातील शाळांच्या पडपडताळणीमध्ये आता इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे इयत्ता दुसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांची पटपडताळणी ११, १५ व २२ एप्रिल रोजी करण्यात येणार असून, याच कालावधीत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचीही पडपडताळणी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी या बाबतच्या सूचना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे राज्यातील शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खासगी अनुदानित शाळांतील दुसरी ते आठवी या इयत्तांची पॅट परीक्षा ११, १५ आणि २२ एप्रिल रोजी घेतली जाणार आहे. त्यामुळे दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची पटपडताळणी या कालावधीत केली जाणार आहे.
इयत्ता नववीची मराठी, गणित आणि इंग्रजी या विषयांची, तसेच अकरावीची मराठी, भौतिकशास्त्र, इंग्रजी या विषयांची वार्षिक परीक्षाही याच दिवशी आयोजित करण्याबाबत या पूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. या पूर्वी पटपडताळणीमध्ये इयत्ता पहिलीचा समावेश करण्यात आला नव्हता. मात्र, आता इयत्ता पहिलीचा पटपडताळणीमध्ये समावेश करून अन्य इयत्तांप्रमाणे त्याच कालावधीत पटपडताळणी करण्यात येणार आहे.
इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या पटपडताळणीसाठी शिक्षण विभागाव्यतिरिक्त जिल्हा परिषदेच्या इतर विभागातील अधिकारी, कर्मचारी यांची सेवा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत उपलब्ध करून घेण्याच्या सूचना विभागीय शिक्षण उपसंचालक, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांना देण्यात आल्या आहेत.
पटसंख्येबाबत अनियमिततेच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे इयत्ता पहिलीचाही समावेश पटपटताळणीमध्ये करण्यात आला आहे. – शरद गोसावी, प्राथमिक शिक्षण संचालक.
समायोजनाची प्रक्रिया सुरू
राज्यातील खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, अध्यापक विद्यालयातील अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याच्या सूचना या पूर्वीच देण्यात आल्या आहेत. त्यानुसार शून्य शिक्षक, शिक्षकेतर पदे मंजूर असणाऱ्या शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर अतिरिक्त कर्मचारी यांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू आहे.
संबंधित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एप्रिल २०२६मध्ये चालू शैक्षणिक वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा वेळापत्रकानुसार घेऊन, निकाल जाहीर झाल्यानंतर, शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर समायोजन केलेल्या शाळांमध्ये हजर व्हायचे आहे, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी स्पष्ट केले आहे.
