scorecardresearch

सर्वोत्कृष्ट राज्याच्या पुरस्कारात महाराष्ट्र दुसरा; नऊ राष्ट्रीय पुरस्कार

महाराष्ट्राने पर्यटन क्षेत्रात केलेल्या कामगिरीवर केंद्र सरकारकडून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

सर्वोत्कृष्ट राज्याच्या पुरस्कारात महाराष्ट्र दुसरा; नऊ राष्ट्रीय पुरस्कार
संग्रहित छायाचित्र

पुणे : महाराष्ट्राने पर्यटन क्षेत्रात केलेल्या कामगिरीवर केंद्र सरकारकडून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडून देण्यात येणाऱ्या पर्यटनविषयक पुरस्कारांत सर्वोत्कृष्ट राज्याच्या पुरस्कारात महाराष्ट्राने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. तसेच राज्याला  नऊ राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. दरवर्षी केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या वतीने २७ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटन दिनी राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार प्रदान केले जातात. करोना काळामुळे दोन वर्षे हे पुरस्कार देण्यात आले नव्हते. त्यामुळे सन २०१८-१९ या वर्षांकरिताचे पुरस्कार विज्ञान भवन, दिल्ली येथे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी, पर्यटन सचिव अरिवद सिंह या वेळी उपस्थित होते. महाराष्ट्राला प्रथमच सर्वोत्कृष्ट राज्यासाठीचा सर्वंकष पर्यटन विकासाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला असून पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी राज्य शासनाच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. हे राष्ट्रीय पुरस्कार उपाहारगृह (हॉटेल), वाहतूक, पर्यटन मार्गदर्शक (गाइड), वैशिष्टय़पूर्ण पर्यटन, नागरी सुविधा अशा विविध श्रेणीत काम करणाऱ्या खासगी आणि सार्वजनिक संस्थांना दिला जातो.

राज्य शासनाचा पर्यटन विभाग सर्वोत्कृष्ट राज्यात दुसरा क्रमांक, नागरी सुविधा (ब-श्रेणी) मध्ये पाचगणी नगरपरिषद (सातारा), ताजमहाल पॅलेस पंचतारांकित डिलक्स (मुंबई), वेलनेस पर्यटन – आत्ममंथन वेलनेस निवासस्थान, मुळशी (पुणे), ग्रामीण पर्यटनात सगुणाबाग (नेरळ), जबाबदार पर्यटन – वेस्टर्न रुट्स (पुणे), गीते ट्रॅव्हल्स – मनमोहन गोयल, वाहतूक (श्रेणी-एक) – ओरिक्स ऑटो इन्फ्रास्ट्रक्चर सव्‍‌र्हिसेस लि., होमस्टे – दाला रुस्तर (पाचगणी) – कॅप्टन विकास गोखले यांना महाराष्ट्रातून पर्यटन क्षेत्रातील केंद्राचे पुरस्कार मिळाले आहेत. 

‘या पुरस्काराने आम्हाला आगामी काळात पर्यटन विकासाच्या कार्याला प्रेरणा आणि ऊर्जा मिळणार आहे. वैविध्यपूर्ण व वैशिष्टय़पूर्ण पर्यटन स्थळे, वाहतुकींचे विकसित जाळे, निवासाच्या दर्जेदार सुविधा आणि अनुभवजन्य पर्यटनाच्या आधारावर आगामी काळात औद्योगिक क्षेत्रातील आघाडी प्रमाणेच पर्यटन क्षेत्रातही महाराष्ट्र आघाडीवर राहील. शाश्वत पर्यटन, सुरक्षित पर्यटन व अनुभवजन्य पर्यटन या त्रिसूत्रीवर आधारित पर्यटन विकासाचे प्रारूप आगामी काळात महाष्ट्रात उभारले जाईल.’

– डॉ. धनंजय सावळकर, सहसंचालक, पर्यटन विभाग

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या