पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील उमेदवारांसाठी घेतली जाणारी सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) येत्या २६ जुलै रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी उमेदवारांना येत्या २ ते १६ जूनपर्यंत नियमित शुल्कासह, तर १७ ते १९ जून या कालावधीत विलंब शुल्कासह परीक्षा अर्ज भरता येणार आहे.

विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी या बाबत परिपत्रकाद्वारे माहिती दिली. विद्यापीठातर्फे दरवर्षी सेट परीक्षा आयोजित केली जाते. सहायक प्राध्यापक पदासाठी सेट परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. त्यामुळे अनेक उमेदवार सेट परीक्षेच्या आयोजनाकडे लक्ष ठेवून असतात. गेल्या तीन वर्षांच्या आकडेेवारीनुसार २०२३मध्ये सुमारे १ लाख १९ हजार, २०२४मध्ये सुमारे १ लाख २८ हजार, तर २०२५मध्ये सुमारे १ लाख १० हजारांहून अधिक उमेदवारांनी सेट परीक्षेसाठी नोंदणी केली होती. या पार्श्वभूमीवर, २०२६साठीच्या परीक्षेचे वेळापत्रक विद्यापीठाने जाहीर केले आहे.

येत्या 26 जुलै रोजी राज्यातील पुणे मुंबई कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजी नगर, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, परभणी, नंदुरबार व गोवा राज्यातील पणजी अशा शहरांमधील परीक्षा केंद्रांवर सेट परीक्षा आयोजित केली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन भरलेला अर्ज विद्यापीठाकडे पाठवू नये, अर्जाची छापील प्रत स्वतःकडे जतन करून ठेवावी. सेट परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ८०० रुपये नियमित शुल्क असून १३०० रुपये विलंब शुल्क आहे. तर आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नियमित शुल्क ६५० रुपये, तर विलंब शुल्क १ हजार १५० रुपये आहे. परीक्षेचे शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांची यादी सेट विभागाच्या संकेतस्थळावर सर्वसाधारणपणे जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध केली जाईल. परीक्षा शुल्क भरूनही यादीत नाव नसलेल्या विद्यार्थ्यांनी शुल्क भरल्याचा पुरावा सेट विभागाकडे ईमेलद्वारे पाठवावा, असे नमूद करण्यात आले आहे.

उत्तीर्ण झालेल्या विषयाची पुन्हा परीक्षा देण्याची संधी नाही

जर विद्यार्थी एखाद्या विषयात आधीच सेट परीक्षा उत्तीर्ण असेल, तर त्याला पुन्हा त्याच विषयात सेट परीक्षा देता येणार नाही, असेही डॉ. पवार यांनी स्पष्ट केले आहे.