पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावीची परीक्षा शुक्रवारपासून (२० फेब्रुवारी) सुरू होत आहे. या परीक्षेसाठी राज्यातील १६ लाख १५ हजार ४८९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३ हजार ८७९ विद्यार्थी वाढले आहेत. बारावी परीक्षेदरम्यान सामूहिक कॉपी प्रकरणे उघडकीस आल्याने दहावीच्या परीक्षेत गैरप्रकार रोखण्याचे राज्य मंडळासमोर आव्हान आहे.
राज्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी पत्रकार परिषदेत दहावीच्या परीक्षेच्या आयोजनाबाबतची माहिती दिली. सचिव डॉ. दीपक माळी या वेळी उपस्थित होते. राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्चदरम्यान होणार आहे.
डॉ. बेडसे म्हणाले, ‘परीक्षार्थ्यांनी नेमून दिलेल्या वेळेपूर्वी किमान अर्धा तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित असणे आवश्यक आहे. सकाळच्या सत्रात १०.३० वाजता, तर दुपारच्या सत्रात २.३० वाजता विद्यार्थ्यांनी परीक्षा दालनात उपस्थित राहणे आवश्यक आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच या परीक्षेसाठीही दहा मिनिटे वेळ वाढवून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी मंडळामार्फत प्रसिद्ध आणि छपाई केलेले वेळापत्रकच ग्राह्य धरावे.’
दृष्टिक्षेपात दहावीची परीक्षा
एकूण विद्यार्थी नोंदणी : १६,१५,४८९
मुलगे : ८,६५,७४०
मुली : ७,४९,७३६
तृतीयपंथी : १५
शाळा : २३,६८३
नियमित विद्यार्थी : १५,५६,५९४
खासगी विद्यार्थी : २९,३०१
दिव्यांग विद्यार्थी : ९,७८८
परीक्षा केंद्रे : ५,१११
परीक्षा केंद्रांमध्ये घट
गेल्या वर्षी दहावीच्या परीक्षेसाठी पाच हजार १३० परीक्षा केंद्रे होती. मात्र, गैरप्रकार आढळलेल्या केंद्रांवर केलेल्या कारवाईमुळे ३१ परीक्षा केंद्रे रद्द करण्यात आली. त्यामुळे यंदा पाच हजार १११ केंद्रांवर परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी २७१ भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. विभागीय मंडळांमार्फत विशेष पथके नेमण्यात आली आहेत. परीक्षा केंद्रांवर बैठी पथके, पोलीस बंदोबस्त ठेवला जाणार असल्याचे डॉ. बेडसे यांनी स्पष्ट केले.
विभागीय मंडळनिहाय विद्यार्थी नोंदणी
पुणे : २,७८,१४५
नागपूर : १,५३,८९०
छत्रपती संभाजीनगर : १,९१,९५२
मुंबई : ३,४९,८७३
कोल्हापूर : १,३२,८०८
अमरावती : १,६५,३१८
नाशिक : २,०६,६३६
लातूर : १,११,०८८
कोकण : २५,७७९
एकूण : १६,१५,४८९
छायाप्रती देणाऱ्या दुकानांसाठी नियम
शिक्षण विभागाच्या नऊ जानेवारीच्या शासन निर्णयानुसार जिल्हा दक्षता समितीची जबाबदारी आणि कार्ये निश्चित करण्यात आली आहेत. त्यानुसार परीक्षा केंद्राच्या ५०० मीटर परिसरातील छायाप्रती काढून देणारी (फोटोकॉपी) दुकाने बंद ठेवणे, संबंधित परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करणे अशा विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

