पुणे : राज्यात इयत्ता नववी ते बारावी या इयत्तांचा अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडे सोपवण्यात आले आहे. गेली काही वर्षे अभ्यासक्रम निर्मितीचे काम महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत (एससीईआरटी) केले जात होते. मात्र, आता पुन्हा नववी ते बारावीच्या अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकांची जबाबदारी राज्य मंडळाकडे देण्यात आली आहे.
राज्यातील माध्यमिक शिक्षणासंबंधीच्या नियमनासाठी राज्य मंडळ आणि विभागीय मंडळ स्थापन करण्यासाठी तरतूद करण्याबाबतच्या ‘महाराष्ट्र शिक्षण मंडळ अधिनियम, १९६५’नुसार संपूर्ण माध्यमिक शिक्षणक्रमासाठी पाठ्यक्रम आणि अभ्यासक्रम ठरवण्याचे अधिकार राज्य मंडळाला आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०नुसार शैक्षणिक वर्ष २०२७-२८मध्ये इयत्ता पाचवी, सातवी, नववी आणि अकरावी या चार इयत्तांना नवा अभ्यासक्रम, नवीन पाठ्यपुस्तके लागू करण्यात येणार आहेत. आता नव्या निर्णयानुसार, इयत्ता नववी आणि अकरावीचा अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके राज्य मंडळाकडून तयार करून पाठ्यपुस्तकांच्या छपाईचे काम बालभारतीकडे देण्यात येणार आहे. राज्य मंडळाच्या कार्यकारी मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या निर्णयाला मान्यता देण्यात आली.
राज्य मंडळाच्या कायद्यानुसार इयत्ता दहावी ते बारावीचा अभ्यासक्रम राज्य मंडळाकडून तयार केला जात होता. मात्र, २०१६मध्ये राज्य सरकारने अभ्यासक्रम निर्मितीची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडे, तर पाठ्यपुस्तकांचे काम बालभारतीकडे दिले. मात्र, राज्य मंडळाच्या कायद्याच्या आधारे पुन्हा इयत्ता नववी ते बारावीचा अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके तयार करण्याची जबाबदारी राज्य मंडळाकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२७-२८ मध्ये इयत्ता नववी आणि अकरावीचा, शैक्षणिक वर्ष २०२८-२९ मध्ये इयत्ता दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके राज्य मंडळाकडून तयार केली जाणार आहेत.
महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या कायद्यानुसार राज्यातील इयत्ता नववी ते बारावीचा अभ्यासक्रम आणि पुस्तके तयार करण्याचे काम राज्य मंडळाकडे देण्याबाबत करण्यात येत असलेली मागणी मान्य करण्यात आली आहे. आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता नववी ते बारावीचा नवीन अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके करण्याचे काम राज्य मंडळाने सुरू केले आहे. त्यासाठी विषयनिहाय अभ्यास मंडळे तयार करण्यात आली आहेत. विषय तज्ज्ञांमार्फत अभ्यासक्रम तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. – डॉ. त्रिगुण कुलकर्णी, अध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ राज्य मंडळाचा अभ्यासक्रम सीबीएसईच्या धर्तीवर तयार करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने नववी ते बारावीचा अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके तयार करण्याचे काम राज्य मंडळाकडे देण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. – महेंद्र गणपुले, माजी मुख्याध्यापक
