पुणे : राज्यातील दहावी आणि बारावीच्या खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीच्या अतिरिक्त गुण मिळवण्यासाठी कागदपत्रांची प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना अर्जात भरावे लागणाऱ्या माहितीचे रकाने, कागदपत्रांची संख्या कमी करण्यात आली असून, सवलतीच्या गुणांसाठी खेळाडू विद्यार्थ्यांना ‘महावन’ संकेतस्थळाद्वारे १ जानेवारी ते १ मार्च या कालावधीत ऑनलाइन अर्ज सादर करावा लागणार आहे.

क्रीडा विभागाने दहावी, बारावीतील खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीच्या अतिरिक्त गुणांच्या प्रक्रियेचे सुलभीकरण, ही सेवा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५अंतर्गत समाविष्ट केल्याचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. खेळाडू विद्यार्थ्यांना सवलतीचे गुण देण्याच्या योजनेत महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन, विविध क्रीडा संघटनांनी सुचवलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी, प्रशासकीय प्रक्रिया अधिक सुलभ, जलद, पारदर्शक करण्यासाठी ‘आपले सरकार’ संकेतस्थळाबाबत अभ्यास करून ही सेवा सेवा हमी कायद्याच्या कक्षेत आणण्याचा निर्णय ३० मार्च २०२६ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे घेण्यात आला. त्यानंतर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्च स्तर समितीच्या ८ सप्टेंबर रोजीच्या बैठकीतील निर्देशानुसार योजनेत सुधारणा करण्यात आल्या आहेत.

नव्या निर्णयानुसार, विद्यार्थ्यांना भराव्या लागणाऱ्या अर्जातील माहितीचे रकाने २९ वरून २२, कागदपत्रांची संख्या ८ वरून ७ पर्यंत कमी करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांचा ‘महावन’ संकेतस्थळावर आधार कार्डाच्या आधारे ‘महाआयडी’ तयार करणे अनिवार्य राहील. या महाआयडीमुळे विद्यार्थ्यांचे नाव, पत्ता, जन्मतारीख आणि मोबाईल क्रमांक अशी माहिती अर्जात आपोआप भरली जाईल. उर्वरित प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना डिजीलॉकरद्वारे सादर करता येतील, असे नमूद करण्यात आले आहे. महा आयटीमार्फत सुधारित डिजिटल प्रणाली विकसित आणि नियंत्रित केली जाणार आहे, असे नमूद करण्यात आले आहे.

सेवा हमी कायद्याअंतर्गत १५ दिवसांत मंजुरी

सेवा हमी कायद्यात योजनेचा समावेश केल्यामुळे विद्यार्थ्याचा अर्ज प्राप्त झाल्यापासून १५ कार्य दिवसांच्या आत प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे. त्यात जिल्हा क्रीडा अधिकारी हे पदनिर्देशित अधिकारी असतील. निर्णयाला आव्हान देण्यासाठी पहिल्यांदा विभागीय उपसंचालकांकडे, त्यानंतर क्रीडा आयुक्तांकडे दुसरे अपील दाखल करता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

त्रिस्तरीय रचना निश्चित

सवलतीच्या गुणाच्या प्रक्रियेत त्रिस्तरीय रचना निश्चित करण्यात आली आहे. क्रीडा अधिकारी स्तरावर विद्यार्थ्यांच्या अर्जांची प्राथमिक पडताळणी करून पात्रतेनुसार गुणांचा प्रस्ताव तयार केला जाणार आहे, जिल्हा क्रीडा अधिकारी स्तरावर प्रस्तावाची अंतिम छाननी करून गुणांची निश्चिती करून शिक्षण मंडळाकडे शिफारस करण्यात येईल, राज्य शिक्षण मंडळाकडून जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या शिफारशीनुसार गुणांना अंतिम मंजुरी देऊन गुणपत्रिकेत गुण समाविष्ट केले जातील, असे स्पष्ट करम्यात आले आहे.