Maharashtra SSC Result 2026 Toppers: पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालात यंदा राज्यातील १७९ विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. सर्वाधिक १०४ विद्यार्थी लातूर विभागातील आहेत. मात्र, गेल्यावर्षीच्या तुलनेत १०० टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाली आहे.
नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी दहावीच्या परीक्षेत गुणांची चुरस असते. अंतर्गत गुण देण्याच्या पद्धतीमुळे गेल्या काही वर्षांत दहावीला १०० टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी सातत्याने दिसून येत आहेत. त्याप्रमाणे यंदाही राज्यातील १७९ विद्यार्थ्यांनी १०० गुण मिळवत लक्षवेधी कामगिरी केली आहे. १०० टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये पुणे विभागातील १२, नागपूर विभागातील ३, छत्रपती संभाजीनगर विभागातील २४, मुंबई विभागातील ५, कोल्हापूर विभागातील १५, अमरावती विभागातील ३, नाशिक विभागातील ६, लातूर विभागातील १०४, कोकण विभागातीलील ७ विद्यार्थी असल्याची माहिती राज्य मंडळाने दिली. तसेच यंदाच्या निकालात ६५ हजार २९७ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त, ९३ हजार ९४३ विद्यार्थ्यांना ८५ ते ९० टक्के, १ लाख २२ हजार ९९० विद्यार्थ्यांना ८० ते ८५ टक्के, १ लाख ४१ हजार ५२९ विद्यार्थ्यांना ७५ ते ८० टक्के गुण मिळाले आहेत.
गेल्या वर्षीच्या दहावीच्या निकालात २११ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले होते. त्यापैकी ११३ विद्यार्थी एकट्या लातूर विभागातील होते. त्यामुळे यंदाही लातूर विभागाने १०० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत राज्यात आघाडी घेतली आहे. मात्र, गेल्यावर्षीच्या तुलनेत राज्यातील पैकीच्या पैकी गुण मिळवलेले, तसेच लातूर विभागातील विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्याचे अधोरेखित होत आहे.
सर्वाधिक विद्यार्थी ४५ ते ६० टक्क्यांदरम्यान
राज्य मंडळाने दिलेल्या माहितीनुसार निकालात ४५ ते ६० टक्क्यांदरम्यान गुण मिळवलेले सर्वाधिक ३ लाख ९० हजार ८९७ (२६.९२ टक्के) आहेत. त्या खालोखाल ६० ते ६५ टक्के गुण मिळवलेले १ लाख ७५ हजार ५५३ विद्यार्थी (१२.६९ टक्के), ६५ ते ७० टक्के गुण मिळवलेले १ लाख ५३ हजार १८० विद्यार्थी (१०.८२ टक्के), तर ४५ टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळालेले १ लाख ५१ हजार ३२९ विद्यार्थी (१०.४२ टक्के) आहेत.
लातूर विभागाचा निकाल राज्यात शेवटून दुसऱ्या स्थानी
यंदा लातूर विभाग वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. लातूर विभागाचा निकाल ८८.४२ टक्के लागला असून, एकूण निकालात लातूर विभाग राज्यात शेवटून दुसऱ्या स्थानी आहे. मात्र, पैकीच्या पैकी गुण मिळवलेले सर्वाधिक विद्यार्थी लातूर विभागाचेच आहेत.
