पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेसाठी आजपासून (१७ फेब्रुवारी) विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यानुसार पालकांना १० मार्चपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत.

प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी परिपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली. नुकत्याच जाहीर केलेल्या ‘आरटीई’च्या सुधारित कार्यपद्धतीनुसार प्रवेशप्रक्रिया राबवली जाणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी ८,६५० स्वयंअर्थसहायित व विनाअनुदानित शाळांमध्ये १ लाख १२ हजार ७०६ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. प्रवेश प्रक्रियेत इयत्ता पहिली किंवा पूर्वप्राथमिक स्तरावर प्रवेश घेता येणार आहे. https://student.maharashtra.gov.in/adm_portal संकेतस्थळाद्वारे अर्ज करावा लागणार आहे.

पालकांना अर्ज करताना कमाल १० शाळांचा प्राधान्यक्रम नोंदवता येणार आहे. निवासस्थानापासून एक किलोमीटर अंतरापर्यंतच्या शाळांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. घर ते शाळा अंतर ‘गुगल मॅप’च्या माध्यमातून निश्चित केले जाणार असून, ‘लोकेशन’ अचूक नमूद करणे बंधनकारक आहे.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग, एचआयव्ही बाधित/प्रभावित, दिव्यांग, अनाथ; तसेच वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना ‘आरटीई’अंतर्गत प्रवेश घेता येणार आहे. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एकाच टप्प्यात ऑनलाइन सोडत काढून प्रवेशपात्र विद्यार्थ्यांची यादी, प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येणार आहे. पहिल्या फेरीतील प्रवेश पूर्ण न झाल्यास प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली जाणार आहे. प्रत्येक टप्प्यावर पालकांना लघुसंदेशाद्वारे माहिती दिली दिली जाणार आहे.

खोटी माहिती दिल्यास प्रवेश रद्द

प्रवेश निश्चित झाल्यानंतर गटशिक्षणाधिकारी किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन समितीकडून कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. पडताळणी समितीत विविध शाळांचे मुख्याध्यापक, पालक प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल. शाळास्तरावर स्वतंत्र कागदपत्र तपासणी केली जाणार नाही. यापूर्वी ‘आरटीई’अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करता येणार नाही. एकापेक्षा अधिक अर्ज भरल्यास कोणताही अर्ज सोडतीसाठी विचारात घेतला जाणार नाही. खोटी किंवा चुकीची माहिती दिल्यास प्रवेश कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. मुदतीनंतर अर्ज स्वीकारला जाणार नाही. दिलेल्या मुदतीत प्रवेश न घेतल्यास ती जागा प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्याला दिली जाणार असल्याचे शरद गोसावी यांनी स्पष्ट केले.

आवश्यक कागदपत्रे

  • पालकांचे आधारकार्ड
  • बालकाचा जन्मदाखला
  • राहत्या पत्त्याचा पुरावा
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्नाचा दाखला (२०२३-२४ किंवा २०२४-२५)
  • दिव्यांग/वैद्यकीय प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • नोंदणीकृत भाडेकरार (भाड्याच्या घरात राहत असल्यास)