पुणे : राज्यातील नवउद्यमी, नवसंशोधकांना त्यांच्या नवनिर्मितीचे, बौद्धिक संपदेचे संरक्षण करता येण्यासाठी राज्य सरकारकडून अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे. बौद्धिक संपदेच्या राष्ट्रीय स्तरावरील नोंदणीसाठी कमाल ५ लाख, आंतरराष्ट्रीय स्तरावरील नोंदणीसाठी कमाल २० लाख रुपयांपर्यंतचा निधी दिला जाणार आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाने ‘महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नावीन्यता धोरण-२०२५’ अंतर्गत बौद्धिक संपदा हक्क नोंदणीच्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या. महाराष्ट्राला नवपिढीच्या उद्योजकांसाठी जागतिक दर्जाचे ‘नवउद्यमी केंद्र’ म्हणून घडवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ‘महाराष्ट्र स्टार्टअप, उद्योजकता आणि नावीन्यता धोरण-२०२५’ मध्ये नावीन्यपूर्ण उत्पादने, तंत्रज्ञान प्रक्रिया, औद्योगिक रचना, संगणक सॉफ्टवेअरद्वारे निर्माण होणाऱ्या बौद्धिक संपदा हक्कांचे संरक्षण, संवर्धन करण्यासाठी नवउद्यमी, नवसंशोधकांना अर्थसाहाय्याची तरतूद करण्यात आली आहे.

नवीन संकल्पना, तंत्रज्ञान किंवा सॉफ्टवेअर विकसित करणाऱ्या सुरुवातीच्या टप्प्यातील नवउद्यमी आणि वैयक्तिक नवोन्मेषकांसाठी एकस्व अधिकार (पेटंट), डिझाइन किंवा स्वामित्व हक्क मिळवणे ही अत्यंत खर्चीक प्रक्रिया असते. यात नवउद्यमी, नवसंशोधकांवर मोठा आर्थिक भार पडतो. त्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्री बौद्धिक संपदा हक्कांसाठी झालेल्या खर्चाची प्रतिपूर्ती करून खर्चाचा भार हलका करण्याचा योजनेचा उद्देश आहे. योजनेअंतर्गत वस्तू आणि सेवा कर, अन्य कर वगळता १०० टक्के रकमेची प्रतिपूर्ती करण्यात येणार आहे. त्यात देशांतर्गत बौद्धिक संपदा हक्कांच्या नोंदणीसाठी एका अर्जदारास कमाल ५ लाख रुपये, आंतरराष्ट्रीय स्तरावरील नोंदणीसाठी कमाल २० लाखांपर्यंतचे आर्थिक साहाय्य केले जाणार आहे. आर्थिक मर्यादेच्या अधीन राहून एकापेक्षा जास्त प्रतिपूर्ती दावे सादर करता येतील, तसेच निश्चित केलेली आर्थिक मर्यादा दरवर्षी नव्याने उपलब्ध होणार नाही किंवा प्रत्येक स्वतंत्र बौद्धिक संपदा अर्जासाठी लागू राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

योजनेत सहभागी होण्यासाठी नवउद्यमी, नवसंशोधकांसाठी काही पात्रता निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यात नवउद्यमीकडे केंद्र सरकारच्या डीपीआयआयटीची मान्यता, स्थापना, मुख्य व्यावसायिक कामकाज महाराष्ट्रात असणे बंधनकारक आहे. देशांतर्गत बौद्धिक संपदा हक्कांच्या दाव्यांसाठी नवउद्यमीची वार्षिक उलाढाल ५ कोटी रुपयांपेक्षा कमी, तर आंतरराष्ट्रीय बौद्धिक संपदा हक्कांच्या दाव्यांसाठी १०० कोटी रुपयांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे. वैयक्तिक नवसंशोधकांनाही या योजनेत सामावून घेऊन त्यांच्या बौद्धिक संपदा हक्कांच्या नोंदणी खर्चाची प्रतिपूर्ती करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले.