पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावी-बारावी परीक्षेबाबत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना अधिकृत माहिती मिळण्यासाठी समाजमाध्यमांची मदत घेण्यात येत आहे. परीक्षेबाबतची अधिकृत माहिती राज्य मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ, मोबाइल ॲप आणि समाजमाध्यमांद्वारे उपलब्ध करण्यात येणार आहे.

राज्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. त्रिगुण कुलकर्णी, सचिव डॉ. दीपक माळी यांनी या बाबत प्रसिद्धिपत्रकाद्वारे माहिती दिली. राज्य मंडळातर्फे बारावीची परीक्षा १० फेब्रुवारी ते १८ मार्च, तर दहावीची परीक्षा २० फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे. राज्यातील सुमारे ३० लाख विद्यार्थी दहावी-बारावीच्या परीक्षा देतात. त्यामुळे या परीक्षा अत्यंत संवेदनशील असतात.

परीक्षेच्या काळात कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य मंडळाकडून कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात. मात्र, परीक्षेच्या काळात पेपरफुटीसारख्या प्रकारांची चर्चा समाजमाध्यमांत मोठ्या प्रमाणात होते. त्यातून विद्यार्थी, शिक्षक, पालकांमध्ये गैरसमज निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर, अधिकृत माहिती पोहोचवण्यासाठी आता युट्यूब, एक्स, फेसबुक अशा समाजमाध्यमांत राज्य मंडळ सक्रिय झाले आहे.

राज्य मंडळाचे संकेतस्थळ, समाजमाध्यमे, मोबाइल ॲपबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात यावी. आगामी फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेदरम्यान महत्त्वाच्या सूचना प्रसारित करण्यासाठी या माध्यमांचा वापर करण्यात येणार आहे. या बाबत प्राचार्य, मुख्याध्यापकांनी नोंद घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, शिक्षण विभागाने अलीकडेच घेतलेल्या निर्णयानुसार, दहावी-बारावीच्या परीक्षांवर देखरेख करण्यासाठी आता राज्यस्तरीय दक्षता समिती नियुक्त करण्यात आली आहे.शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय दक्षता समितीमध्ये राज्य मंडळाचे अध्यक्ष, सर्व परिक्षेत्रांचे विशेष पोलीस महानिरीक्षक, अतिरिक्त आयुक्त, विभागीय आयुक्त सदस्य कार्यालय, प्राथमिक शिक्षण संचालक, माध्यमिक शिक्षण संचालक, शिक्षण योजना संचालक, राज्य मंडळ सचिव यांचा समावेश आहे. दहावी, बारावीच्या परीक्षा शांततेत आणि तणावमुक्त वातावरणात पार पडण्यासाठीचे वातावरण तयार करणे, राज्यभर कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवणे ही जबाबदारी राज्यस्तरीय समितीवर असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

तर जिल्हा स्तरीय समितीला परीक्षेच्या एक दिवस आधी परीक्षा केंद्रावरील भौतिक सुविधा व्यवस्थित असल्याची खात्री करणे, जिल्ह्यातील सर्व उपद्रवी, संवेदनशील केंद्राची माहिती संकलित करणे, परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षेशी संबंधित सर्व खोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध असल्याची, चित्रीकरणाची साठवणूक होत असल्याबाबतची खात्री करणे, उपद्रवी आणि संवेदनशील परीक्षा केंद्र परिसरावर ड्रोन कॅमेऱ्याद्वारे देखरेख ठेवणे, कॉपीमुक्त अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी ‘सीसीटीव्ही’चे नियंत्रण जिल्हा प्रशासनाच्या कार्यालयात ठेवणे, जिल्ह्यातील मोठ्या परीक्षा केंद्रांसाठी प्रश्नपत्रिका नेणे, उत्तरपत्रिका गोळा करण्यासाठी आवश्यकतेनुसार शासकीय वाहने उपलब्ध करणे, प्रश्नपत्रिकांच्या वाहतुकीसाठी सहायक परिरक्षकाबरोबर सुरक्षिततेसाठी पोलीस कर्मचारी अथवा गृहरक्षक शिपाई देणे, सर्व परीक्षा केंद्रांवर भरारी पथके, बैठी पथके, पोलीस बंदोबस्त नियुक्त करणे, भरारी पथकात किमान एका महिला प्रतिनिधीचा समावेश करणे, कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे, मदत करणारे व प्रत्यक्ष गैरमार्ग करणाऱ्यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.