पुणे : संगणक टायपिंग, राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थी परीक्षा योजना (एनएमएमएस) परीक्षांवेळी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे यंदा यंदा राज्यातील काही केंद्रांवर ‘सीसीटीव्ही’चा वापर करण्यात आला. त्यानंतर या परीक्षांचा यंदाचा निकाल आणि गेल्यावर्षीच्या याच परीक्षांच्या निकालाची तुलना केली असता, यंदा या परीक्षांच्या निकालात लक्षणीय घट झाल्याचे आढळून आले आहे. काही ठिकाणी ९० टक्क्यांपर्यंत निकाल कमी झाला असून, ‘सीसीटीव्ही’ने परीक्षांच्या निकालांना दणका बसल्याचे दिसून येत आहे.
राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी या बाबत माहिती दिली. संगणक टायपिंग, एनएमएमएस या परीक्षांचे आयोजन राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून करण्यात येते. परीक्षांवेळी गैरप्रकार रोखण्यासाठी राज्यातील काही परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गेल्यावर्षीच्या परीक्षेत ७० टक्क्यांपेक्षा जास्त निकाल लागणाऱ्या काही केंद्रांवर यंदाच्या परीक्षेवेळी प्रायोगिक तत्त्वावर सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यात आली.
यंदा संगणक टायपिंग परीक्षेसाठी अहिल्यानगर, सोलापूर, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, बुलढाणा, यवतमाळ, गोंडिदा, चंद्रपूर, धाराशिव, नांदेड या जिल्ह्यांतील, तर एनएमएमएस परीक्षेसाठी अहिल्यानगर, धुळे, कोल्हापूर, जालना, अमरावती, अकोला, नंदूरबार, लातूर, वाशिम, भंडारा, धाराशिव या जिल्ह्यांतील काही केंद्रांवर ‘सीसीटीव्ही’चा वापर करण्यात आला. संगणक टायपिंग परीक्षेसाठी २०५ केंद्रे होती. त्यात काही केंद्रांवर सीसीटीव्ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली होती, असे डॉ. बेडसे यांनी सांगितले.
सीसीटीव्ही बसवलेल्या केंद्रांचा यंदाचा निकाल आणि गेल्यावर्षीचा त्याच केंद्राचा निकाल यांची तुलना करण्यात आली. त्यात संगणक परीक्षेचा निकाल एका टक्का ते ९० टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचे दिसून आले. तर एनएमएमएस परीक्षेच्या निकालात ६ ते ९० टक्के घट झाल्याचे दिसून येते. परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही बसवण्यासह पर्यवेक्षकीय यंत्रणेमध्येही बदल करण्यात आले. जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था, शिक्षकांचे सहकार्य घेण्यात आले. केवळ काही परीक्षा केंद्रांवर प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आलेल्या उपक्रमातून समोर आलेले निकालातील तफावतीची आकडेवारी स्वयंस्पष्ट आहे. सीसीटीव्ही प्रणाली परीक्षांसाठी किती परिणामकारक ठरते, सीसीटीव्हीच्या वापरामुळे गैरप्रकारांना आळा बसत असल्याचे दिसून येते, असे डॉ. बेडसे यांनी नमूद केले.
