पुणे : शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) बोगस, डमी उमेदवारांसह कोणतेही गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य परीक्षा परिषदेकडून परीक्षेदरम्यान काटेकोर उपाययोजना केल्या जाणार आहेत. त्यात परीक्षार्थी उमेदवारांची प्रत्यक्ष तपासणीसह अद्ययावत तंत्रज्ञानाचीही जोड देण्यात आली असून, ‘फोटो व्ह्यू’ आणि ‘कनेक्ट व्ह्यू’ या दोन नव्या प्रणाली परीक्षा परिषदेने उपाययोजनांमध्ये समाविष्ट केल्या आहेत. त्यात ‘फोटो व्ह्यू’ प्रणाली उमेदवार पडताळणीसाठी, तर ‘कनेक्ट व्ह्यू’ प्रणाली वेगवान संपर्कासाठी वापरली जाणार आहे.
राज्य परीक्षा परिषदेतर्फे येत्या २३ नोव्हेंबर रोजी ‘टीईटी’ परीक्षा राज्यभरातील परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ‘टीईटी’ अनिवार्य असल्याबाबत दिलेल्या निर्णयानंतर या परीक्षेचे महत्त्व वाढले आहे. तसेच, केंद्रप्रमुख भरती परीक्षेतही ‘टीईटी’ उत्तीर्ण असणे आवश्यक करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या ‘टीईटी’च्या तुलनेत यंदा ‘टीईटी’च्या नोंदणीमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. या ‘टीईटी’ला ४ लाख ७५ हजारांपेक्षा अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे.
२०१८ आणि २०१९ मध्ये झालेल्या ‘टीईटी’ परीक्षेत गैरप्रकार उघडकीस आले होते. त्यात अनेक उमेदवारांची संपादणूक रद्द करण्याची कारवाई करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षीपासून राज्य परीक्षा परिषदेने गैरप्रकार रोखण्यासाठी अत्यंत काटेकोर उपाययोजना करण्यात सुरुवात केली आहे. गेल्यावर्षी केलेल्या उपाययोजनांमध्ये यंदा दोन नव्या प्रणालींची भर घालण्यात आली आहे.
शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) पारदर्शकता, विश्वासार्हता कायम राहावी, परीक्षा शिस्तबद्ध रीतीने घेतली जावी यासाठी परीक्षा परिषद प्रयत्नशील आहे. – डॉ. नंदकुमार बेडसे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद.
प्रवेशपत्र उपलब्ध
राज्य परीक्षा परिषदेतर्फे ‘टीईटी’चे प्रवेशपत्र उमेदवारांना १० नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर या कालावधीत https://mahatet.in/ या संकेतस्थळाद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उमेदवारांनी त्यांच्या प्रवेशपत्राची मुद्रित प्रत उपलब्ध करून घ्यावी. दिलेल्या मुदतीत प्रवेशपत्र उपलब्ध करून न घेतल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी उमेवारांची असेल, असे परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केले.
