पुणे : पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून अनेक पिढ्या घडवणाऱ्या, राज्यातील दोन कोटींहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षणाशी जोडणाऱ्या महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे (बालभारती) हीरक महोत्सवी वर्ष सुरू होत आहे. त्यानिमित्त बालभारती गीताची निर्मिती करण्यात आली असून, येत्या वर्षभरात बालसाहित्याच्या पुस्तकांचे प्रकाशन, पाठ्यपुस्तकांवरील परिषद असे विविध उपक्रम आयोजित केले जाणार आहेत.

केंद्र सरकारच्या कोठारी आयोगाने १९६४मध्ये राज्यांनी पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीसाठी स्वायत्त संस्थेची स्थापना करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार तत्कालीन राज्य सरकारने २७ जानेवारी १९६७ रोजी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) स्थापन केले. त्यानुसार पाठ्यपुस्तकांसाठी आशयनिर्मिती, पाठ्यपुस्तकांची छपाई, वितरणाचे काम बालभारतीकडून केले जाते. राज्यातील गेल्या सहा दशकांत बालभारतीने राज्य मंडळाशी संलग्न शाळांतील विद्यार्थ्यांना भाषा, गणित, विज्ञान, इतिहास अशा विविध विषयांची पाठ्यपुस्तके सातत्याने उपलब्ध करून दिली आहेत. तसेच ‘किशोर’ या मासिकाद्वारे विद्यार्थ्यांना वाचनाची गोडीही लावली गेली. त्यामुळे बालभारतीशी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि भावनिक नातेही जोडले गेले आहे.

बालभारतीच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभरातील कार्यक्रमांच्या नियोजनाबाबतची माहिती बालभारतीच्या संचालक अनुराधा ओक यांनी दिली. ‘हीरक महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून तयार करण्यात आलेल्या ‘बालभारती’च्या गीताचे लोकार्पण केले जाणार आहे. गीतकार प्रा. दासू वैद्य यांनी लिहिलेले हे गीत अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केले आहे, तर वैशाली सामंत यांनी ते गायले आहे. तसेच, येत्या वर्षभरात बालसाहित्याची ६० पुस्तके प्रकाशित केली जाणार आहेत. पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीबाबत राष्ट्रीय स्तरावरील परिषदेचे आयोजन, पाठ्यपुस्तके आणि अवांतर वाचनासाठीची पुस्तके ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध करणे, नव्या अभ्यासक्रमानुसार ‘ई बालभारती’द्वारे डिजिटल माध्यमात आशयनिर्मिती करण्याचे नियोजन आहे,’ असे ओक यांनी सांगितले.

शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत मंगळवारी कार्यक्रम, प्रदर्शनाचे आयोजन

बालभारतीच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त मंगळवारी (२७ जानेवारी) शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या उपस्थितीत बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी पाच वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंग देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी, राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष नंदकुमार बेडसे आदी उपस्थित राहणार आहेत. तसेच २५ ते २७ जानेवारी या कालावधीत बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांपैकी निवडक ६० पाठ्यपुस्तकांच्या मुखपृष्ठांचे प्रदर्शन बालगंधर्व कलादालन येथे भरणार आहे.

बालभारतीची वैशिष्ट्ये

  • मराठीसह आठ माध्यमांतील पाठ्यपुस्तकांची निर्मिती, छपाई, वितरण
  • सात कोटींहून अधिक पाठ्यपुस्तके, २.५० कोटींहून अधिक कृतिपत्रिका ३५ जिल्हा परिषदा, २२ महापालिका, नगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांना उपलब्ध
  • शिक्षकांसाठी हस्तपुस्तिकांची निर्मिती