पुणे : राज्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम गुरुवारपासून (१५ ऑक्टोबर) झाला असून, आतापर्यंत २० कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले आहेत. हंगामासाठी राज्यातील २१३ कारखान्यांनी अर्ज केले असून, उर्वरित कारखान्यांच्या प्रस्तावांची छाननी सुरू असल्याची माहिती साखर आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली. दरम्यान, परवान्याशिवाय कारखाना सुरू केल्यास कारवाई करण्याचा इशारा साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी दिला आहे.

राज्यातील साखर कारखान्यांना गाळप हंगाम सुरू करण्यासाठी सप्टेंबरमध्ये ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यानुसार २१३ कारखान्यांचे अर्ज साखर आयुक्तालयाकडे प्राप्त झाले आहेत. या अर्जांमधील कागदपत्रांची पडताळणी आणि परवान्यासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींची पूर्तता तपासली जात आहे. प्रस्तावातील आवश्यक बाबी पूर्ण झाल्यानंतर संबंधित कारखान्यांना गाळप परवाने दिले जात आहेत. आत्तापर्यंत २० कारखान्यांना परवाने मिळाल्याची माहिती साखर आयुक्त डाॅ. संजय कोलते यांनी दिली.

यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मात्र, परवाना मिळाल्यानंतर कारखान्यांना त्यापूर्वीही गाळप सुरू करता येणार आहे. त्यामुळे परवाना मिळालेल्या कारखान्यांकडून हंगाम सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

दरम्यान, पावसातील खंडामुळे राज्यातील अनेक भागांत उसाची वाढ अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. या परिस्थितीत गाळप हंगाम लवकर सुरू केल्यास उसाच्या उपलब्धतेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे हंगाम लवकर सुरू करण्याबाबत शेतकरी संघटनांकडून विरोधाची भूमिका घेण्यात आली आहे.