पुणे : राज्यातील शिक्षक भरतीअंतर्गत शाळा व्यवस्थापनांना रिक्त पदांच्या जाहिराती नोंदवण्यासाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार आता व्यवस्थापनांना १० जुलैपर्यंत जाहिराती नोंदवता येणार असून, शिक्षक भरतीच्या जाहिरातींच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खासगी अनुदानित शाळांतील शिक्षकांच्या रिक्त पदांच्या भरतीची प्रक्रिया शिक्षण विभागाच्या पवित्र संकेतस्थळामार्फत राबवण्यात येते. त्यानुसार २०२५ची पदभरती प्रक्रिया शिक्षण विभागाने मे महिन्यात सुरू केली. या अंतर्गत शिक्षक पदभरतीच्या जाहिराती संकेतस्थळावर नोंदवण्यासाठी ३१ मेपर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर १५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर काही व्यवस्थापनांना जाहिरात देण्यास काही कालावधीची आवश्यकता असल्याने पुन्हा ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता पुन्हा तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यातील हजारो पात्रताधारक उमेदवार शिक्षक भरती प्रक्रियेकडे डोळे लावून बसले आहेत. मात्र, जाहिराती नोंदवण्यास पुन्हा पुन्हा मुदतवाढ देण्यात येत आहे. या मुदतवाढीतून किती पदे उपलब्ध होणार, हा प्रश्न आहे.
पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीची प्रक्रिया सुलभ पद्धतीने होते. त्यामुळे गेल्या काही वर्षांत या माध्यमातून हजारो उमेदवारांना शिक्षक म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा किंवा अनुदानित शाळांमध्ये नोकरीची संधी मिळाली आहे. मात्र, अद्यापही राज्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असल्याने त्याचा परिणाम अध्ययन अध्यापनावर होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षक भरती प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पदभरतीबाबतचे अधिक तपशील पवित्र संकेतस्थळावरच देण्यात येत आहेत.
पवित्र संकेतस्थळामार्फत २०१७ आणि २०२२मध्ये शिक्षक पदभरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यामुळे आता २०२५च्या पदभरतीकडे पात्रताधारक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.
