पुणे : राज्यातील शाळांतील शिक्षक भरती प्रक्रियेत मुलाखतीशिवाय निवड प्रकारात उमेदवारांच्या शिफारशीनंतर आता मुलाखतीसह निवड प्रकारात १० हजार ३२८ जागांसाठीही लवकरच उमेदवारांची शिफारस करण्यात येणार आहे. या प्रकारातील शिक्षक भरती सप्टेंबरअखेरपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न असून, त्यानंतर भरतीच्या दुसऱ्या टप्प्यात किमान पाच हजार जागा उपलब्ध होण्याचा शिक्षण विभागाचा अंदाज आहे.

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित शाळांतील शिक्षक भरती पवित्र संकेतस्थळामार्फत राबवण्यात येत आहे. या अंतर्गत या मुलाखतीशिवाय निवड आणि मुलाखतीसह निवड या दोन प्रकारांतील पदांसाठीच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. मुलाखतीशिवाय निवड या प्रकारासाठी उपलब्ध झालेल्या १९ हजार ७५४ जागांसाठी १३ हजार ११९ उमेदवारांची शिफारस करण्यात आली. त्यात जिल्हा परिषद, नगरपालिका-नगर परिषदा, महानगरपालिका, आदिवासी विकास विभागाच्या शासकीय शाळा, शासकीय विद्यानिकेतन, खासगी शैक्षणिक संस्थांमधील जागांचा समावेश आहे. समांतर आरक्षणातील माजी सैनिक, अंशकालीन आरक्षणातील अनुक्रमे २७६०, १७६० जागा त्या प्रवर्गाचे उमेदवार न मिळाल्याने रिक्त राहिल्या. त्यामुळे या रिक्त जागा भरण्यासाठी रूपांतरित फेरी (कन्व्हर्टेड राउंड) राबवण्याचे शिक्षण विभागाचे नियोजन आहे. त्यासाठीचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला आहे.

मुलाखतीसह निवड या प्रकारात सुमारे १० हजार ३२८ जागांवर भरती करण्यात येणार आहे. या प्रक्रियेसाठी शासन निर्णयानुसार ४५ दिवसांचा कालावधी असणार आहे. यात संबंधित उमेदवारांना मुलाखतीला बोलावणे, एका उमेदवाराला तीन ठिकाणी मुलाखत देण्याची संधी, शिफारस झालेल्यांना नियुक्तीचा आदेश, नियुक्ती देऊनही रुजू न झाल्यास प्रतीक्षेत असणाऱ्या उमेदवारांना संधी देणे ही प्रक्रिया राबविली जाईल. साधारणत: सप्टेंबरअखेरपर्यंत मुलाखतीसह शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण होईल, अशी माहिती शिक्षण उपसंचालक राजेश शिंदे यांनी दिली.

दुसरा टप्पा सप्टेंबरमध्ये

‘शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा ऑक्टोबरमध्ये सुरू होईल. सप्टेंबरअखेरपासून दुसऱ्या टप्प्यातील शिक्षकभरतीच्या प्रक्रियेची पूर्वतयारी सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात खासगी अनुदानित शाळांची बिंदूनामावली पूर्ण होऊ शकली नाही, त्या शाळांमधील शिक्षक भरतीची पदे दुसऱ्या टप्प्यात भरली जाणार आहेत. या टप्प्यात कनिष्ठ महाविद्यालयांसह काही जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसह खासगी अनुदानित शाळांमधील सुमारे पाच हजार पदे उपलब्ध होऊ शकतील, असे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.