पुणे : राज्यातील शिक्षकांना १२ वर्षे आणि २४ वर्षांच्या सेवेनंतर दिल्या जाणाऱ्या वरिष्ठ आणि निवडश्रेणीसाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे प्रशिक्षण जूनमध्ये आयोजित करण्याचे नियोजन होते. त्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, राज्यातील शिक्षकांना जनगणनेचे काम असल्यामुळे आता हे प्रशिक्षण लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या सुट्टीत हे प्रशिक्षण आयोजित केले जाण्याची चिन्हे आहेत.
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक डॉ. हेमंत वसेकर यांनी या बाबत परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत. शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित शाळांतील शिक्षकांना १२ वर्षांच्या सेवेनंतर वरिष्ठ श्रेणी आणि २४ वर्षांच्या सेवेनंतर निवडश्रेणी दिली जाते. त्यानुसार वरिष्ठ श्रेणीसाठी ३० एप्रिलपर्यंत १२ वर्षांची, तर निवडश्रेणीसाठी ३० एप्रिलपर्यंत अर्हताकारी सेवा पूर्ण करणे अनिवार्य आहे. काही शिक्षक, मुख्याध्यापक १ मे २०२६ ते ३० एप्रिल २०२७ या कालावधीत अर्हताकारी सेवा पूर्ण करून या कालावधीत निवृत्त होणार आहेत. त्यामुळे संबंधित शिक्षक, मुख्याध्यापकांना वरिष्ठ, निवडश्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी करता येणार आहे. जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेतर्फे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच कालावधीत प्रत्यक्ष स्वरुपात (ऑफलाइन) हे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे.
प्रशिक्षणासाठी प्राथमिक गट (पहिली ते चौथी, पहिली ते पाचवी, पहिली ते सातवी, पहिली ते आठवी, सहावी ते आठवी), माध्यमिक गट (नववी ते दहावी), उच्च माध्यमिक गट (अकरावी, बारावी), अध्यापक विद्यालय गट असे चार गट करण्यात आले आहेत. प्रशिक्षण वर्ग मराठीतून होणार आहे. वाचनसाहित्य मराठीव्यतिरिक्त इंग्रजी आणि उर्दू या भाषांमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. शिक्षकांच्या प्रशिक्षणाचा कालावधी स्वतंत्रपणे कळवला जाणार असल्याचे या पूर्वीच जाहीर करण्यात आले होते. शिक्षकांना प्रशिक्षणासाठी शुल्क भरून ऑनलाइन नोंदणीसाठी २९ एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर १२मे पर्यंत मुदतवाढही देण्यात आली होती.
या पार्श्वभूमीवर राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक डॉ. हेमंत वसेकर यांनी परिपत्रकाद्वारे दिलेल्या सूचनांनुसार, शिक्षकांच्या वरिष्ठ श्रेणी, निवड श्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन जूनच्या पहिल्या आठवड्यात केले जाते. मात्र, देशाच्या जनगणनेचा पहिला टप्पा १६ मे ते १४ जून या कालावधीत नियोजित आहे. त्यासाठी बहुतांश शिक्षकांची नियुक्ती झालेली आहे. त्यामुळे हे प्रशिक्षण आता नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या सुट्टीत आयोजित करण्याचे नियोजन सुरू आहे. जून ते ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सेवेची १२ किंवा २४ वर्षे पूर्ण होऊन सेवानिवृत्त होणाऱ्या, संकेतस्थळावर प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेल्या शिक्षकांचे प्रशिक्षण नोव्हेंबरपूर्वी आयोजित करण्याबाबत पडताळणी सुरू आहे.
