पुणे : टीईटी परीक्षा, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून नियुक्तीसह विविध प्रलंबित मुद्द्यांबाबत राज्यातील शिक्षक संघटनांनी गुरुवारी (९ जुलै) शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाच्या अनुषंगाने ज्या शाळा बंद राहतील, त्या शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शिक्षण क्षेत्रात टीईटी, शिक्षकांना बीएलओ नियुक्तीवरून वातावरण तापले आहे. टीईटीतून कार्यरत शिक्षकांना सूट द्यावी, तमिळनाडूच्या धर्तीवर शिक्षकांसाठी स्वतंत्र परीक्षा घ्यावी. टीईटी ऑनलाइन पद्धतीनेच परीक्षा घ्यावी, शिक्षकांना बीएलओचे काम देऊ नये, शिक्षकांना शाळेत शिकवण्यासाठी वेळ द्यावा, १५ मार्च २०२४ च्या संच मान्यता धोरणामुळे ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षणाची दुरवस्था होत आहे. तीन वर्गाला एक शिक्षक देऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी खेळ केला असल्याने या धोरणात बदल करावा या आणि अशा अन्य मुद्यांबाबत विविध मागण्या शिक्षक संघटनांनी केल्या आहेत. या मागण्यांसाठी ९ जुलै रोजी सामूहिक रजा घेऊन शाळा बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. राज्यातील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, मध्यवर्ती शिक्षक संघटना शिक्षक संघटना, शिक्षक संघटना समन्वय समिती, प्रहार शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, कास्ट्राईब शिक्षक संघटना, स्वतंत्र समता शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख सभा, महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ, कोल्हापूर शैक्षणिक व्यासपीठ, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ अशा संघटनांचा आंदोलनात सहभाग आहे. आंदोलनाअंतर्गत मोर्चा, धरणे धरण्यात येणार आहे.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांना परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत. विद्यार्थी हित लक्षात घेता ९ जुलै रोजी कोणतीही शाळा बंद राहणार नाही याची दक्षता घ्यावी, ज्या शाळा ९ जुलै रोजी बंद राहतील, त्या शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याची कार्यवाही करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.