पुणे : राज्य परीक्षा परिषदेतर्फे रविवारी (२८ जून) महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) आयोजित करण्यात आली आहे. बंगाली, कन्नड, तेलगू, गुजराथी आणि सिंधी माध्यमातून परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची संख्या राज्यात कमी असल्याने संबंधित उमेदवारांसाठी विशिष्ट जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली आहेत.

परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चोथे यांनी या बाबतची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. टीईटी परीक्षा विविध भाषा माध्यमातून देण्याचा पर्याय उमेदवारांना उपलब्ध असतो. त्यानुसार उमेदवार त्यांच्या पसंतीच्या माध्यमाची निवड करतात. मात्र, मराठी, इंग्रजी माध्यमाच्या तुलनेत अन्य माध्यमातील उमेदवारांची संख्या कमी असल्याने या उमेदवारांसाठी माध्यमानुसार परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. यंदा परीक्षेसाठी उच्चांकी ६ लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे.

बंगाली माध्यमाच्या ११६ उमेदवारांना ठाणे आणि चंद्रपूर येथे परीक्षा केंद्र देण्यात आली आहे. कन्नड माध्यमातील सर्वाधिक ८०१ उमेदवारांसाठी ठाणे, सोलापूर आणि सांगली येथे केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. तेलुगू माध्यमातील उमेदवारांना पुणे आणि नागपूर येथे केंद्र उपलब्ध करून देण्यात आली असून, या माध्यमातील उमेदवारांची संख्या ४४ आहे. गुजराती माध्यमासाठी नोंदणी केलेल्या १५० उमेदवारांची ठाणे आणि नंदुरबार येथे केंद्र निश्चित करण्यात आली आहे. सिंधी माध्यमातील केवळ ९ उमेदवार असून, त्यांच्यासाठी पुणे येथे केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. राज्यातील कमी संख्येतील उमेदवारांना केंद्र उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हानिहाय नियोजन करण्यात आल्याचे परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. संबंधित माध्यमांतील उमेदवारांनी परीक्षा केंद्रांच्या जिल्हानिहाय माहितीकडे लक्ष देऊन त्यानुसार तयारी करावी, असे आवाहन परिषदेकडून करण्यात आले आहे.