पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २८ जून रोजी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) गैरप्रकार रोखण्यासाठीचे नियम आणखी कठोर करण्यात आले आहे. उमेदवारांना परीक्षेवेळी दुपट्टा, बुरखा, मास्क, टोपी या पैकी काहीही परिधान करता येणार नाही. त्याशिवाय पेपरफुटी रोखण्यासाठी प्रश्नपत्रिकेवर विशिष्ट क्रमांक, क्यूआर कोड देण्यात आला असून, त्याद्वारे कोणत्याही टप्प्यावर प्रश्नपत्रिका ओळखता येणार आहे.
अलीकडेच वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या नीट परीक्षेत पेपरफुटीचा प्रकार उघडकीस आला. राष्ट्रीय पातळीवरील परीक्षेतील पेपरफुटीच्या प्रकरणामुळे राज्य परीक्षा परिषदेने टीईटी परीक्षेबाबत अधिक सावध भूमिका घेतली आहे. त्यामुळे टीईटी परीक्षेसाठी उमेदवारांना सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्रात प्रवेश करताना प्रत्येक उमेदवार, परीक्षेच्या कामकाजातील कर्मचाऱ्यांचे मेटल डिटेक्टरच्या सहाय्याने तपासणी, प्रत्येक उमेदवाराचे फेस रिकग्निशन केले जाईल. मूळ नोंदणीकृत उमेदवाराऐवजी अन्य कोणी प्रवेश केल्याचे आढळल्यास संबंधितावर तत्काळ फौजदारी कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे म्हणाले, टीईटी परीक्षेतील ‘पेपर एक’साठी ७०१ केंद्र, तर ‘पेपर दोन’साठी एक हजार २८ केंद्रावर वर्ग खोल्या, प्रवेश, लॉबी, केंद्र संचालक कक्ष असे एकूण १८ हजार ७१७ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. या कॅमेऱ्यांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्याशिवाय राज्यभरातील परीक्षा केंद्रांवर तत्काळ संपर्कासाठी कनेक्ट व्ह्यू, उमेदवारांची पडताळणी करण्यासाठी फोटो व्ह्यू या प्रणालीचा वापर केला जाणार आहे.
गेल्यावर्षी झालेल्या परीक्षेवेळीही परीक्षा परिषदेने या प्रणालीचा वापर केला होता. यंदा पहिल्यांदाच प्रश्नपत्रिकेवरील प्रत्येक पानावर विशिष्ट क्रमांक आणि क्यूआर कोड देण्यात आला आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या प्रत्येक उमेदवाराला एक क्रमांक मिळणार आहे. प्रत्येक उमेदवाराची प्रश्नपत्रिका कोणत्याही टप्प्यावर ओळखता येऊ शकणार आहे.
तसेच प्रश्नपत्रिका समाजमाध्यमांत आल्यास ती कोणत्या उमेदवाराची प्रश्नपत्रिका आहे, हे समजू शकणार आहे, असेही डॉ. बेडसे यांनी सांगितले.प्रश्नपत्रिकेतील किती प्रश्न सोडवले, किती सोडवायचे राहिले याची माहिती उमेदवारांना नोंदवावी लागणार आहे. ती माहिती परीक्षा केंद्रातील पर्यवेक्षकांकडून तपासली जाईल. जेणेकरून पुढे कोणतीही तांत्रिक अडचण उद्भवणार नाही, असे परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चोथे यांनी स्पष्ट केले.
लेखनिकासाठी पूर्वपरवानगी आवश्यक
दिव्यांग उमेदवारांना लेखनिकाची गरज असल्यास त्यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्यावरून पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. तसेच संबंधित लेखनिक इयत्ता बारावीपेक्षा जास्त शिकलेला नसावा. त्याचे वय २८ जून २०२६ रोजी १९ वर्षांपेक्षा कमी असावे. तो उमेदवाराच्या कुटुंबातील नसावा, ऐनवेळी परीक्षा केंद्रावर लेखनिकास परवानगी दिली जाणार नाही, असेही परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.
