पुणे : राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) पेपरफुटीनंतर आता पुन्हा परीक्षा घेताना ती संगणक आधारित पद्धतीने (ऑनलाइन) पद्धतीने आयोजित करण्याबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून चाचपणी करण्यात येत आहे. परीक्षा ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष (ऑफलाइन) पद्धतीने घेण्याबाबतचा निर्णय अंतिम झाल्यानंतर नव्याने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे, अशी माहिती परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
सर्वोच्च न्यायालयाने सर्वच शिक्षकांना टीईटी पात्र होणे बंधनकारक असल्याचा निर्णय सप्टेंबर २०२५मध्ये दिला. तसेच टीईटी पात्र होण्यासाठी २०२८पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. राज्यात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे टीईटी परीक्षा आयोजित केली जाते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर टीईटी परीक्षेच्या नोंदणीमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येते. परीक्षा परिषदेने २८ जून रोजी राज्यात टीईटी परीक्षा आयोजित केली होती. या परीक्षेसाठी एकूण ६ लाख १२५ अर्ज दाखल झाले होते. त्यासाठी नोंदणी केलेल्या ४ लाख २८ हजार १२२ उमेदवारांमध्ये २ लाख २६ हजार २६३ कार्यरत शिक्षकांचा समावेश होता. परीक्षेत गैरप्रकार होऊ नयेत, या दृष्टीने काटेकोर उपाययोजनाही करण्यात आल्या होत्या. मात्र, २७ जून रोजी भिवंडी येथे टीईटीचे पेपर फुटल्याची घटना उघडकीस आली. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेत (नीट) पेपरफुटीचे प्रकरण ताजे असतानाच टीईटीचे पेपर फुटल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली. टीईटीचा सुधारित दिनांक यथावकाश जाहीर करण्यात येणार असल्याचे परीक्षा परिषदेने स्पष्ट केले.
पेपरफुटीच्या अनुषंगाने विधिमंडळ अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्यात आला असता, शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी पेपरफुटीमुळे रद्द झालेली टीईटी परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असून, विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही; तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्याचा विचार करण्यात येईल, असे स्पष्ट केले. पेपरफुटी प्रकरणातील दोषींना जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करेल. परीक्षा पारदर्शक करण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत, अशी माहिती त्यांनी विधिमंडळात दिली.
या पार्श्वभूमीवर, आता राज्य परीक्षा परिषदेने पुन्हा टीईटी आयोजित करण्यासाठी काम सुरू केले आहे. टीईटी ऑनलाइन घेण्याच्या दृष्टीने चाचपणी करण्यात येत आहे. सर्वांत आधी परीक्षा ऑनलाइन घ्यायची, की प्रत्यक्ष (ऑफलाइन) हे निश्चित करण्यात येईल. त्यानंतर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांनी दिली.
