पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे येत्या रविवारी (२८ जून) होणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) गैरप्रकार रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्या अंतर्गत उमेदवारांना बूट घालण्यास मनाई करण्यात आली आहे. उमेदवारांना चप्पल, स्लीपर, सँडल अशी उघडी पादत्राणे वापरण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी या बाबतची माहिती दिली. टीईटी परीक्षेसाठी उच्चांकी ४ लाख २८ हजार १२२ उमेदवारांनी मिळून पेपर एक आणि पेपर दोन मिळून एकूण ६ लाख १२५ अर्ज केले आहेत. नोंदणी केलेल्यांमध्ये २ लाख २६ हजार २६३ कार्यरत शिक्षकांचा समावेश आहे. दोन सत्रांत ही परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्रावर उमेदवारांची तपासणी, झडती (फ्रिस्किंग), ओळख पडताळणी करणे, हजेरी नोंदवणे यासाठी उमेदवारांनी परीक्षा सुरू होण्याच्या वेळेच्या किमान दीड तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.

परीक्षेच्या दिवशी वाहतूक समस्या किंवा अन्य समस्या लक्षात घेऊन वेळेआधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. प्रवेशासाठीच्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत परीक्षार्थींना प्रवेश दिला जाणार नाही. ओळखीच्या पुराव्यासाठी आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पारपत्र, पॅन कार्ड, स्मार्ट कार्ड प्रकारचा वाहन परवाना यापैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र सादर करणे अनिवार्य आहे. परीक्षेच्यावेळी प्रवेशपत्र आणि वर दिलेल्या वैध ओळखपत्रांपैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र आणि त्याची सुस्पष्ट छायांकित प्रत सादर न केल्यास परीक्षेस प्रवेश नाकारण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे.

टीईटी परीक्षेवेळी महिला उमेदवारांना बुरखा, हिजाब, दुपट्टा वापरण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र, परीक्षा कक्षात उमेदवाराचा चेहरा सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसावा यासाठी परीक्षा कालावधीत वर्गखोलीत उमेदवाराला मानेच्या वर म्हणजेच कान, चेहरा, तोंडावर कोणत्याही प्रकारचे आवरण असता कामा नये. तसेच परीक्षा कक्षात कोणत्याही प्रकारचे बूट वापरण्यास परवानगी असणार नाही. चप्पल, सँडल, स्लीपर अशा स्वरुपाची उघडी पादत्राणे वापरण्याबाबतच्या सूचना परीक्षा परिषदेने दिल्या आहेत.

सर्वाधिक नोंदणी पुणे जिल्ह्यातून, सर्वांत कमी सिंधुदूर्ग जिल्ह्यातून

टीईटी परीक्षेसाठी सर्वाधिक ४५ हजार ५६२ उमेदवार पुणे जिल्ह्यातील आहेत. त्या खालोखाल अहिल्यानगर जिल्ह्यातील ३१ हजार ६५५, सोलापूर जिल्ह्यातील २८ हजार २९८, नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार २८०, कोल्हापूर जिल्ह्यातील २३ हजार ८८२, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २९ हजार ४१४, नागपूर जिल्ह्यातील १७ हजार ७२, नांदेड जिल्ह्यातील ३० हजार ७६ उमेदवार आहेत. सर्वांत कमी ९३७ उमेदवार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत.